स्वच्छ सर्वेक्षणात दत्तक नाशिक स्पर्धेबाहेर; ही आहेत कारणे…

0
नाशिक । केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या दहा शहरांत नाशिकचा नंबर येईल अशी अपेक्षा बाळगून असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पदरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपने निराशा टाकली आहे. पर्यायाने दत्तक नाशिककरांच्या पदरातदेखील निराशा पडली आहे. केंद्र शासनाने घोषित केलेल्या विशेष पुरस्कारांच्या यादीत राज्यातील 9 शहरांची निवड झाली असून पुन्हा एकदा नाशिक मागे गेल्याचे समोर आले आहे. आता स्वच्छ सर्वेक्षणात खराब प्रदर्शन करणार्‍या शहरांची यादी जाहीर होणार आहे.

केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने फेब्रुवारी ते मार्च यादरम्यान देशभरातील 4200 शहरांच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पाठोपाठ तिसर्‍या वर्षी नाशिककरांची निराशा झाली आहे. कर्नाटक येथील निवडणुकांमुळे विलंब झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा निकाल बुधवारी शहरी विकास मंंत्रालयाने जाहीर केला. यात केवळ या स्पर्धेतील विशेष पुरस्कार मिळालेल्या शहरांची नावे जाहीर केली आहेत.

यात नागपूर, सातारा जिल्ह्यातील पाचगणी, अमरावती जिल्ह्यातील शेंदुर्जना घाट, पुणे जिल्ह्यातील सासवड, मुंबई, परभणी, भुसावळ, भिवंडी अशा शहरांचा समावेश आहे. यातील भुसावळ व भिवंडी ही शहरे नाशिक शहराच्या पुढे गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्वच्छ सर्वेक्षणाची मोठी तयारी करून जनजागृती करणार्‍या नाशिक महापालिकेच्या स्वच्छतेसंदर्भातील कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. आता स्वच्छ सर्वेक्षणात खराब प्रदर्शन करणार्‍या शहरांत नाशिक शहर किती क्रमांकावर जाते याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

नाशिक शहरे स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या दहा शहरांत येईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक दौर्‍यावर व्यक्त केली होती. त्यानुसारच सत्ताधारी भाजपकडून सर्वेक्षणादरम्यान तयारी करण्यात आली होती. त्यामुळे महापौरांनीदेखील यंदाच्या स्पर्धेत पहिल्या 20 शहरांत नाशिक शहराची निवड होईल, असे स्पष्ट केले होते. मात्र जाहीर झालेल्या विशेष पुरस्कारांत नाशिकची निराशा झाली.

मात्र नाशिकला दत्तक घेणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहराला उत्कृष्ट कार्यशैलीचा पुरस्कार मिळाला. पूर्वी सर्वात गलिच्छ शहर म्हणून घोषित झालेल्या भुसावळची कामगिरी उंचावली आहे. सर्वेक्षण स्पर्धेतील सविस्तर निकाल अद्याप जाहीर झालेला नसून आता 4200 शहरांत नाशिक महापालिकेचा कितवा नंबर येणार याची उत्सुकता नाशिककरांना लागली आहे.

यंदाचे स्वच्छ सर्वेक्षण चांगलेच गाजले 

यंदाच्या सर्वेक्षणानिमित्त आरोग्य विभागाने शहरातील काही प्रमुख चौक व गर्दीच्या बाजारपेठेत कचर्‍यासाठी डस्टबिन लावल्या होत्या. ही डस्टबिन खरेदी वादात सापडली होती. बाजारातील किमतीपेक्षा अनेक पटीने जास्त किंमत लावून यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेकडून झाला होता.

यात तात्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाने वादात सापडले होते. त्या प्रकरणी तात्कालीन आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी या डस्टबिनच्या किमती व गुणवत्ता यासंदर्भात चौकशी लावली होती. बाजारपेठेत लाखो रुपये खर्च करून लावण्यात आलेल्या डस्टबिन व स्टॅण्ड चोरीस गेले होते. अशाप्रकारे स्वच्छ सर्वेक्षण वादा अडकले होते.

या सहा कारणांमुळे नाशिक स्पर्धेतून बाद झाले…

४ जानेवारीपासून सुरु झालेले सर्वेक्षणात प्रत्येक घरापर्यंत महापालिका पोहोचू शकली नाही.

अनेक भागात घंटागाडीची नियमितता नाही. त्यामुळे कचरा पडून राहतो.

ओव्हरटाइमच्या नावाखाली रात्रीची सफाई होत नव्हती, त्यावर कोट्यावधी रुपये खर्च होत असल्याचे कारण देत गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेने बंद केली.

स्वच्छ सर्वेक्षणाची बॅनरबाजी करत शहराच्या विद्रुपीकरणात भाग घेतला.

ओला व सुका कचरा मोहिमेला उशिराने सुरुवात झाली. ही व्यवस्था होईपर्यंत या स्पर्धेची पाहणी आटोपली होती.

हागणदारीमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी सार्वजनिक शौचालयांची संख्या कमी प्रमाणात आहे.

LEAVE A REPLY

*