नाशिक जिल्हा प्रशासन देणार 24 तास नागरी सेवा ; पथदर्शी प्रकल्प राबवणार

0

नाशिक : प्रशासकीय कारभार अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना 24 तास सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

याकरिता इन्फोर्मेशन किऑस्क या एटीएमसदृश्य मशीनद्वारे 24 तास मिळणार आहे. याव्दारे सातबारा उतारा, न्यायालयाचे निकाल, इ-डिस्ट्रिक्ट अंतर्गत येणारे निकाल, विविध शासकीय दाखले, रेकॉर्डरुममधील सर्व कागदपत्रे या सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. हा पथदर्शी प्रकल्प प्रथमच नाशिक जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे.

प्रशासन लोकाभिमुख व्हावे, नागरिकांना शासकीय कार्यालयात खेटे मारावे लागू नये, यासाठी शासनाने सर्वच सेवा या अ़ॉनलाईन सुरू केल्या आहेत. इ-गर्व्हनन्स अंतर्गत प्रथम दाखल्यांपासून सुरुवात केलेल्या महसूल प्रशासनाने आता दाखले, आरटीजीएस अपीलचे निकाल, आपले सरकार पोर्टवरील सुविधा, न्यायालयांचे निकाल या सर्वच बाबी थेट नागरिकांसाठीच उपलब्ध केल्या आहेत.

त्यासाठी त्यांना कुठल्याही महा-ई-सेवा, सेतू किंवा सायबर कॅफेमध्ये जाण्याची गरज ठेवली नाही. या सर्व सेवा आपले पोर्टलद्वारे घरबसल्या उपलब्ध करून देण्यात आल्या असल्या तरी तहसील कार्यालयात 24 तास या सेवा देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. हा पथदर्शी प्रकल्प आहे. त्यासाठी नमुना म्हणून 16 इन्फोर्मेशन किऑस्क मशीन जिल्ह्यात उपलब्ध केल्या जाणार असून पंधरा तालुक्यांच्या तहसील कार्यालयात प्रत्येकी एक आणि जिल्हाधिकारी कार्यालयात एक मशीन उपलब्ध राहाणार आहे.

सरळ एटीएम स्वरुपात असलेल्या मशीनमध्ये 10 रुपये टाकल्यानंतर त्यातून तुम्हाला हवे असलेली सर्वच माहिती, प्रिंटसह उपलब्ध होईल. तालुक्यातील चाचणी यशस्वी झाल्यानंतर प्रत्येक मंडळांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे मशीन उपलब्ध केले जाणार आहे.

एटीएमचीही असेल सुविधा : शासकीय सेवा-सुविधांसोबतच त्यातून पैसेही काढण्याची अर्थात एटीएमचीही सुविधा उपलब्ध करण्याचा मानस जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. परंतु तुर्तास तयार करण्यात आलेले या इन्फोर्मेशन किऑस्क मशीनद्वारे प्रथम प्राधान्याच्या शासकीय सेवा उपलब्ध केल्यानंतरच एटीएमची सुविधा सुरू केली जाणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले

LEAVE A REPLY

*