Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

दुपारपर्यंत नगर शहरात शुकशुकाट

Share

पोलिसांचा तगडा बंदोबस्त; ड्रोनसह 50 अधिकार्‍यांची नजर

अहमदनगर (प्रतिनिधी) – अयोध्या येथील वादग्रस्त जागेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळपासून नगर शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. संवेदनशील भागात गस्त, एसआरपीच्या पथकाचे संचलन झाले. ड्रोन कॅमेर्‍याच्या सह्याने पोलीस शहरावर नजर ठेवून होते.

नगर शहरातील संवेदनशील आणि नेहमी तणावपूर्ण ओळख असणार्‍या तेलीखुंट, सर्जेपुरा, मुकुंदनगर, माळीवाडा वेस, चितळे रोड, रामचंद्र खुंट, केडगाव, झेंडीगेट ही ठिकाणी पोलिसांनी खडा पहारा तैनात केला होता. नगर शहरात 60 वाहनांतून 50 पोलीस अधिकारी हालचालीवर बारीक नजर ठेवून आहेत. याशिवाय एसआरपीच्या तीन प्लाटून, आरसीएफचे तीन प्लाटून आणि एक वज्र वाहन बंदोबस्तात तैनात आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर उपअधीक्षक संदीप मिटके हे स्वत: स्थितीवर नजर ठेवून आहेत.

शनिवारी शासकीय सुट्टी असल्याने आणि दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने शाळा बंद होत्या. यामुळे शहरात वर्दळ तुरळक होती. दुपारपर्यंत कापड बाजार, चितळे रस्ता, नवी पेठ या भागातील निम्म्यापेक्षा अधिक दुकाने बंद होती. सर्वांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष होते. अपेक्षेप्रमाणे सकाळी 11पर्यंत निकाल हाती येण्यास सुरूवार झाली. दुपारी 12 नंतर शहरातील माळीवाडा, पुणे आणि तारकपूर बसस्थानकांवर नेहमीपेक्षा कमी गर्दी होती.

निकालानंतर अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम बांधवांनी शांतता ठेवण्याचे आवाहन केले. दिवसभरात शहरात एकही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान पोलीसांनी कोतवाली पोलीस ठाण्यातंर्गत दोघांवर जमाबंदीच्या आदेशाचे उल्लांघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यात अतुल रावसाहेब दातरंगे सातपुते तालीम, नगर आणि जावेद बिलाल शेख पंचपिर चावडी यांचा समावेश आहे.

ड्राय डे अन् बंदी
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात दोन दिवसांचा ड्राय डे जाहीर केला आहे. याशिवाय आयोध्या निकाल, ईद-ए-मिलाद अन् त्यापाठोपाठ असलेल्या गुरूनानक जयंतीमुळे रॅली, वाद्य वाजविणे, मिरवणूकीस, विना परवानगी फ्लेक्स, बैठका, मेळावे घेण्यालाही बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 9 ते 15 तारखेदरम्यान (चार दिवस) आहे.

व्हाटसअप शेअरींग बंद
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी उशीरापर्यंत सोशल मिडीयावरील व्हॉट्सअ‍ॅप्स बातम्या आणि अन्य मेसेजचे शेअरिंग बंद असल्याचे दिसले. अनुचित आणि खोटे मेसेज पाठविणार्‍यांवर कारवाईचा इशारा असल्याने सोशल मिडियावर याबाबत कमालीची शांतता होती. अनेक व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुव पेजवर अ‍ॅडमीनकडून अन्य मॅसेज ब्लॉक करण्याचे धोरण अवलंबण्यात आले होते. त्यामुळे सोशल मिडीया पहिल्यांदाच प्रगल्भ झाल्याचे दिसून आले.

सोशल मिडियावर निगराणी
सोशल मिडियावर वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र सायबर सेल कार्यरत आहे. एसपी ऑफिसमध्ये दोन अधिकारी, पंधरा कर्मचारी त्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. दोन दिवस हे पथक कार्यरत असणार आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर सायबर सेलकडून सातत्याने तपासून पाहिले जात होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!