Type to search

Featured सार्वमत

शहरात मुहूर्त मिळाला डांबरीकरणाला आणि पाऊस आला अडचणीला

Share

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- श्रीगोंदा पालिकेची 17 रस्त्यांची काम बर्‍यापैकी उरकत आणले असताना पालिका निवडणुकीत बंद असलेली कामे आता या ठेकेदाराकडून त्या ठेकेदाराकडे देत कामे उरकण्याचा सपाटा लावला आहे. काम चालू असले तरी उपनगराध्यक्ष यांच्या घराच्या परिसरात डांबरीकरण सुरू केले आणि पावसाला सुरुवात झाली अणि मग पर्याय नसल्याने ठेकेदारानेही पाण्यातच डांबरीकरण उरकले. या सर्व घाईगडबडीत कामाची गुणवत्ता तपासायला कामावर पालिकेचा अभियंताही नाही आणि पालिकेचा सल्लागार देखील उपस्थित राहायला तयार नसल्याचे दिसले. शहरात 17 रस्त्यांच्या कामांसाठी दोन वर्षांपूर्वी तब्बल 33 कोटी रुपये निधी मिळाला यातील कामे सुरू व्हायला अगोदर वर्ष गेले. वादग्रस्त निविदा प्रकरण गाजले नंतर कामेही सुरू झाली. मात्र या कामाच्या वेळी अनेकांच्या नजरा फिरल्या आणि कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित व्हायला लागले यातच नगरपालिका निवडणुका पार पडल्या यातही राजकारण झाले. ठेकेदाराला काम बंद ठेवण्याचा तर कधी काम लवकर पूर्ण करण्याचा सल्ला दिला गेला. यात काही रस्त्याची अर्धवट कामे पूर्ण झाली नाहीत.ती कामे पालिका निवडणुकीनंतर सुरू करण्यात आली आहेत.

आता पारगाव रस्ता कामाचे खडीकरण करताना एक तर गुणवत्ता दिसत नाही.त्यातच काम सुरू असताना रस्ता ही चालूच आहे. खडीकरण रोलिंग करताना इतर वाहनांची ये-जा सुरू होते. अंदाजपत्रक केवळ नावालाच. रस्त्याचे काम करताना अंदाजपत्रक तयार केले जाते या अंदाजपत्रकानुसार कामे करावी लागतात. मात्र, या कामात अंदाजपत्रकाप्रमाणे काम होते का? हे पाहणार कोण आणि ठेकेदार तर मनमानी पध्दतीने काम करत आहेत. बस स्थानक परिसरात सुरू असलेल्या डांबरीकरण कामाच्या वेळेत नेमका पाऊस आला अणि या पावसात काम थांबवायचे कसे? असा प्रश्न कामगारांना पडल्याने त्यांनीही साठलेल्या पाण्यात काम उरकून घेतले. सामान्य नागरिक याबाबत विचारत होते मात्र त्यांना याचे उत्तर द्यायला पालिकेचा ना अभियंता होता ना कर्मचारी अणि अधिकारी यामुळे हे काम पावसातच मार्गी लागले.

पालिकेचा अभियंता सोडेना खुर्ची
कामे सुरू असताना पालिकेचा अभियंता नवीन असल्याने त्यांना यातले काही कळायला मार्ग नाही. तरी हा अभियंताही या कामावर फिरकायला तयार नाही.पालिकेचे सल्लागार एजन्सी बोलायला तयार नसताना नव्याने निवडून आलेले नगरसेवक तरी काम होताना गुणवत्तेबाबतीत जागरुक राहणार का? असा प्रश्न असताना ठेकेदार देखील कामे कशी उरकतील याकडे लक्ष देत आहेत.

ठेकेदार कोण, सब ठेकेदार कोण आणि काम करतोय कोण
पालिका हद्दीत 17 रस्त्यांच्या कामाची निविदा ज्या ठेकेदाराने घेतली त्याने काम तोडून इतर काही ठेकेदाराना दिले .यातील काही कामे या सब ठेकेदाराने केली तर काही अर्धवट सोडून दिली. ही अर्धवट कामे उरकताना नेमका कामाचा ठेकेदार कोण आहे. हे कळायला मार्ग नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!