महावीर जयंतीनिमित्त नगरमध्ये भव्य शोभायात्रा

0

रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण

अहमदनगर (प्रतिनिधी) – अहिंसा परमो धर्म: अशा महान परममंत्राचा उपदेश देत संपूर्ण मानवजातीला दिशा देणार्‍या भगवान महावीर स्वामींची 2618 वी जयंती (जन्मकल्याणक) नगरमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी सकल जैन समाजातर्फे नगरशहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. याशिवाय चौक सजावट, रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. शोभायात्रेनंतर आनंदधामच्या पवित्र प्रांगणात साधूसाध्वीजींनी भगवान महावीर स्वामींच्या जीवन चरित्रावर प्रवचन दिले. महावीर जयंतीदिनी आज सकाळी कापड बाजार जैन मंदिरापासून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. या शोभायात्रेत सनई, नगारा, चौघडा, बॅण्ड पथक, घोडेस्वार, उंट स्वार, डोक्यावर मंगल कलश घेतलेल्या मुली, विविध वेशभूषा परिधान केलेले लहान मुले, त्यानंतर पांढरे वस्त्र परिधान केलेले पुरुष व केसरी, पिवळ्या, लाल साड्या परिधान केलेल्या महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.

पुढे ही शोभा यात्रा अर्बन बँक चौक, घुमरे गल्ली, गुजर गल्ली, आदेश्वर जैन मंदिर, लक्ष्मी कारंजा, चितळे रोड, नेता सुभाष चौक, नवीपेठ जैन स्थानक, घासगल्ली, महात्मा गांधी रोड, तेलीखुंट चौक, दाळमंडई, आडतेबाजार, गंजबाजार, सराफबाजार, जुना कापडबाजार, खिस्तगल्ली, बुरूडगल्ली, जुनी वसंत टॉकीज, सहकार सभागृह मार्गे धार्मिक परीक्षा बोर्ड आनंदधाम येथे दाखल झाली. शोभायात्रा मार्गावर विविध मंडळे, जैन भाविकांनी आकर्षक चौक सजावट केली होती. आनंद संस्कार शिक्षा अभियानच्या विद्यार्थ्यांनी मनोवेधी लेझीम डाव सादर केले. सिमंधर स्वामी भक्ती मंडळाने टिपरी नृत्य सादर केले. रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. त्रिशलानंदन वीर की, जय बोलो महावीर की अशा घोषणा देण्यात आल्या. चौकाचौकात भाविकांना पिण्याचे पाणी, प्रसादाचे वाटप करण्यात आले.
भगवान महावीर स्वामींची भव्य प्रतिमा असलेले वाहन, रथ व शेवटी अनुकंपा (प्रसाद)ची गाडीही होती. या शोभायात्रेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, शिवसेना उपनेते अनिल राठोड, आ.संग्राम जगताप, कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा, आनंदराम मुनोत, संतोष बोथरा, महावीर बडजाते, डॉ.प्रकाश कांकरिया, चंपालाल मुथा, संतोष गांधी, अशोक (बाबूशेठ) बोरा आदी सहभागी झाले होते.

शोभायात्रेनंतर आनंदधाम येथे महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी महाराज, प्रखर वक्ता तरूणसागरजी महाराज यांचे गुरु आचार्य पुष्पदंत सागरजी महाराज, प्रबुध्द विचार आदर्शऋषीजी महाराज, स्वाध्यायप्रेमी पद्मऋषीजी महाराज, संस्कार दिवाकर आलोकऋषीजी महाराज, स्थविरा विमलकंवरजी महाराज, साध्वीरत्ना किरणप्रभाजी महाराज, सेवाभावी पुष्पकुंवरजी महाराज, डॉ.प्रियदर्शनाजी महाराज, सत्यप्रभाजी महाराज, सेवाभावी दिव्यदर्शनाजी महाराज, प्रसन्नमूर्ती सम्यकदर्शनाजी महाराज, विश्वदर्शनाजी महाराज, उपप्रवर्तिनी अर्चनाजी महाराज आदि ठाणा आदि साधूसाध्वीजींच्या उपस्थितीत प्रवचन तथा गुणगाण झाले. यावेळी नेहा ओस्तवाल, समृध्दी शेटिया, दिया मुथा, निहारिका बडजाते या मुलींनी भक्तीगीते तसेच कविता सादर केल्या. याठिकाणी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी स्वागत केले. यावेळी श्रावक संघाचे सेक्रेटरी संतोष बोथरा, कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा, महावीर बडजाते, संतोष गांधी, सविता रमेश फिरोदिया आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी महाराज म्हणाले की, भगवान महावीर यांच्या जन्माला जन्मकल्याणक म्हटले जाते. जन्मकल्याणक हे आत्म्याला अंधारातून प्रकाशाकडे घेवून जाणारे असते. राजभवनाबाहेर पडत त्यांनी साडेबारा वर्षांची कठोर साधना केली. यातून ते केवलज्ञानी झाले. आपल्याला प्राप्त झालेल्या आत्मज्ञानाचा उपयोग त्यांनी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी केला. अहिंसा, सत्य आणि अपरिग्रहाचा विचार त्यांनी कायम मांडला. जो आजच्या काळातही तितकाच महत्त्वपूर्ण आहे. आदर्शऋषीजी महाराज म्हणाले की, जे रात्री प्रकाश देत त्याला दिवा म्हणतात, जो दिवसा प्रकाश देते त्याला सूर्य म्हणतात, मात्र जे हजारो वर्षांपासून समस्त मानवजातीला विचारांचा प्रकाश देत आहेत, त्यांना भगवान महावीर म्हणतात. आज 2600 वर्षानंतरही महावीर स्वामींचे विचार मानवजातीला तारणारे आहेत. यातूनच त्यांची महानता कळून येते.

आचार्य पुष्पदंत सागरजी महाराज म्हणाले की, दुसर्‍यांना योग्य मार्ग दाखवून देत त्यांना तारणारे तीर्थंकर असतात. भगवान महावीर स्वामींनी सर्वांना सत्य, अहिंसा, ब्रम्हचर्य, अपरिग्रह आणि क्षमा या पाच व्रतांचे पालन करण्याचा संदेश दिला. त्याचबरोबर साधू, साध्वी, श्रावक आणि श्राविका या चार तीर्थांची स्थापना केली. त्यामुळे त्यांना तीर्थंकर म्हटले जाते. आजचे जग व्यावहारिक झाले आहे. अशांतता, भौतिकवाद वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर भगवान महावीरांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे हे प्रत्येक मनुष्याचे ध्येय व कर्तव्य असले पाहिजे. असे ते म्हणाले. कार्यक्रमानंतर माणिकचंद पेमराज बोथरा (पारस ग्रुप) परिवाराच्यावतीने सर्वांसाठी गौतम प्रसादीची व्यवस्था करण्यात आली होती.

महावीर जयंतीदिनी सत्य व अहिंसेचा संदेश

नवीपेठ येथे जय आनंद मंडळातर्फे मिरवणुकीचे स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी) – सत्य व अहिंसेचा संदेश देणार्या भगवान महावीरांच्या विचारांचे स्मरण करीत नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाने दरवर्षीप्रमाणे महावीर स्वामींचा जगा व जगू द्या हा संदेश दिला. समस्त प्राणीमात्रांचे कल्याण हाच मानवधर्म असल्याची शिकवण देणारी सजावट करताना मंडळाने कमल पुष्पावर भगवान महावीरांची मूर्ती विराजमान करून विविध धार्मिक तसेच सामाजिक संदेश दिले. शिक्षा अभियान, बेटी बचाओ, वृक्षलागवड, शाकाहार सर्वश्रेष्ठ आहार, अहिंसा परमो धर्म:, समस्त प्राणीमात्राची सेवा, जगा आणि जगू द्या असे संदेश या सजावटीतून देण्यात आले. याशिवाय महावीर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीतील भाविकांना मंडळातर्फे पौष्टिक चिक्कीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंडळाच्या सदस्यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या आबालवृध्दांचे जय जिनेंद्रचा जयघोष करीत स्वागत केले.

यावेळी बोलतांना शैलेश मुनोत म्हणाले, मंडळाच्या नावातच भगवान महावीर स्वामी व आचार्यश्रींचे नाव आहे. त्यामुळे या महान विभूतींच्या विचारांचे तंतोतंत पालन करीत मंडळ सामाजिक तसेच धार्मिक कार्यात अग्रेसर असते. भगवान महावीरांनी समस्त मानवजातीबरोबरच भूतलावरील प्रत्येक प्राणीमात्राच्या कल्याणाचा संदेश दिला. सत्य व अहिंसेचे तत्त्वज्ञान त्यांनी समाजाला दिले. अहिंसा परमो धर्म: सांगणारे त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असून मंडळाने नेहमीच या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याचे काम केले आहे. मंडळाचे सेक्रेटरी कुंतीलाल राका यांनी स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला मंडळाच्या अध्यक्षा गुंजन भंडारी, सेके्रटरी सविता मुथा यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*