नगरमध्ये एलईडीचा प्रस्ताव तातडीने सादर करा

jalgaon-digital
2 Min Read

महापौर वाकळे : विद्यूत विभागाच्या कारभाराबाबत नाराजी

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेचा पथदिव्यांच्या वीजबिलावर होणारा खर्च कमी करण्यासाठी शहरात एलईडी दिवे बसविण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन असून अशा प्रकारचा प्रकल्प राबविलेल्या राज्यातील इतर महापालिकांची माहिती घेण्याचे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी विद्यूत विभागाला दिले.

शहरातील पथदिव्यांबाबतच्या वारंवार येणार्‍या तक्रारींसंदर्भात महापौर वाकळे यांनी शुक्रवारी (दि.29) सायंकाळी विद्यूत विभागाची बैठक घेतली. बैठकीस नगरसेवक विनित पाऊलबुधे, सुनिल त्र्यंबके, रविंद्र बारस्कर, बाळासाहेब पवार, अजिंक्य बोरकर, संजय ढोणे, सुरज शेळके, सतीश शिंदे, विद्यूत विभाग प्रमुख कल्याण बल्लाळ आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत विद्यूत विभागाच्या कामकाजाबाबत महापौर वाकळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यूत विभागाचे कर्मचारी व्यवस्थित काम करत नाहीत. नगरसेवकांचे फोन उचलत नाहीत, यापुढील काळात हे खपून घेतले जाणार नाही. कामचुकार कर्मचार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

शहरातील पथदिव्यांच्या वीजबिलाचा खर्च कमी करण्यासाठी एलईडी दिवे लावण्याचा प्रस्ताव आहे. हे दिवे लावल्यानंतर किती वीजबचत होईल, तसेच एलईडी दिव्यांसाठी महापालिकेला किती खर्च येईल, कोणत्या रस्त्यावर किती वॅटचे दिवे लावावे लागतील, कॉलनीत किती वॅटचे दिवे लागतील याचा अभ्यास करुन तसेच अशा प्रकारचा प्रकल्प राबविलेल्या इतर महापालिकांमधून माहिती घेऊन प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मला विद्यूत विभाग नको : बल्लाळ
महापालिकेच्या विद्यूत विभागाचे प्रमुख अभियंता कल्याण बल्लाळ यांनी बैठकीत आपली व्यथा मांडली. ते म्हणाले, आपण सिव्हील इंजिनइर असून विद्यूत विभागाचा आपणास अनुभव नाही. त्यामुळे माहिती नसलेल्या कोणत्याही प्रस्तावावर आपण सही करणार नाही. मला जेलमध्ये जायचे नाही. विद्युत विभागाच्या प्रमुखपदी त्या विभागाची माहिती असलेला विद्यूत अभियंता नेमावा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *