जवानाने सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडत केली तिघांची हत्या

मृतात नाशिक जिल्ह्यातील सहकारी जवान आणि त्याच्या पत्नीचा समावेश

0

नाशिक | तेलंगाणा येथील जवानाने आपल्या पत्नीसह नाशिक जिल्ह्यातील सहकारी जवान आणि त्याची पत्नी अशा तिघांची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे चिंचोली गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी जवानाला निलंबित करण्यात आले असून स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे ही घटना घडली. मृत जवान आणि त्याची पत्नी नाशिक जिल्ह्यातील व सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी आहेत. हा प्रकार अनैतिक संबंधामुळे घडला असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राष्ट्रीय जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी सिन्नर तालुक्यातील राजेंद्र केकाणे हा जवान कर्तव्य बजावत होता. तेलंगणा येथील जवान सुरिंदर राजेंद्रचा मित्र असल्याचे समजते. सीआयएसएफच्या शालिमार चौकातील कॉलनीमध्ये सुरिंदर राहत होता.

त्याने अचानक त्याच्या पत्नीवर सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो राजेंद्रच्या घरी पोहोचला व त्याने राजेंद्रच्या पत्नीसह राजेंद्रला गोळ्या झाडून ठार केले. या घटनेत सुरिंदरची पत्नी, राजेंद्र आणि त्याची पत्नी या तिघांचा मृत्यू झाला.

हलाखीच्या परिस्थितीतून राजेंद्र लष्करात भरती झाला होता. त्याचा लहान भाऊदेखील पठाणकोट येथे लष्करात आहे.

राजेंद्रच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण चिंचोली गाव शोकसागरात बुडाले आहे. घरची परिस्थती हलाखीची असल्याने राजेंद्रने ठाणगाव येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.

शेतात मजुरीचे काम करून मजुरीच्या पैशांतून त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्याचे मूळगाव सिन्नर तालुक्यातील टेंभुरवाडी असले तरी राजेंद्रचे आयुष्य तालुक्यातील चिंचोली येथे मामाच्या गावी गेले.

मुंबई (चेंबूर ) येथील सीआईएसएफच्या भरतीसाठी गेल्यानंतर तो सीआयएसएफमध्ये नोकरीला लागला. २००८ मध्ये डेहराडून येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर राजेंद्र नोकरीत दाखल झाला.

२०११ मध्ये राजेंद्रचा विवाह संगमनेर तालुक्यातील क-हे – निमोण येथील मुलीशी झाला. त्यांना आर्यन व अनुष्का ही दोन मुले झाली. दहा- बारा दिवसांपूर्वीच राजेंद्र सहकुटूंब गावी येऊन गेला होता.
राजेंद्रचा लहान भाऊ गणेशलाही मोठ्या भावाप्रमाणे देशसेवेची इच्छा असल्याने त्यानेही सैन्य भरतीसाठी जाण्याचे ठरवले. २०१२च्या सैन्य भरतीत गणेशही सैन्य दलात दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

*