तब्बल 2 हजार क्विंटल हिरवी मिरची!; बाजार आवारात मध्यरात्री दोन वाजेपर्यंत लिलाव

0
नाशिक (सोमनाथ ताकवाले) | नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसाला शेतमालाची प्रचंड आवक सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या सत्रात होत आहे.

काल बाजार समितीत सुमारे दोन हजार क्विंटल मिरची आवक झाली. एवढ्या प्रमाणात आलेल्या मिरचीची विक्री करण्यासाठी आवारात रात्री दोन वाजेपर्यंत लिलाव सुरू होते.

फळभाज्या, पालभाज्यांसह बाजार आवारात कांदा, बटाटा आणि फळांची आवक तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे विक्री व्यवहाराचे वेळापत्रक कोलमडून पडत आहे. दुपारच्या सत्रात वांगे, कारली, दोडके, भोपळा , गिलके, कोबी,फ्लॉवर या फळभाज्यांची आवक त्र्यंबक, नाशिक, दिंडोरी, निफाड, इगतपुरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात होत आहे.

त्यामुळे खरेदीदारांना संपानंतर मोठ्या प्रमाणात परपेठेत माल पाठवण्यासाठी मालाची विपूल आवक मिळत आहे. त्यामुळे यार्डात चांगले दर असल्याची चर्चा शेतकरी आपसात करून नाशिकच्या बाजार समितीतच लिलावासाठी माल विक्रीसाठी आणण्यावर भर देत आहे.

शेतकरी संपानंतर बाजार समितीत कळवण, देवळा, दिंडोरी या भागातून हिरवी मिरची विक्री आणणार्‍या शेतकर्‍यांचे प्रमाण अधिक आहे. संप काळात किरकोळ स्वरुपात मिरचीचे दर 80 ते 100 रुपये प्रतिकिलोवर गेले होते. तसेच मिरची परराज्यातून आणून विक्रेत्यांना नाशिकमध्ये विक्री करावी लागत होती. त्यामुळे मिरचीची गरज लक्षात घेऊन आणि मिळणार्‍या अधिक दर पाहून मिरची उत्पादकांनी दोन दिवसांपासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत लवंगी, ज्वाला या मिरचीची आवक वाढवली आहे.
बाजार समितीतील असलेल्या आडत्यांच्या व्हेजिटेबल कंपन्यांमध्ये काल सायंकाळी पाच वाजेपासून मिरचीच्या गाड्यांची रिघ लागलेली होती. मिरचीचे पोते उतरून घेऊन ते सेल हॉलमध्ये लिलावासाठी मांडण्यात आल्याने उरलेल्या मिरचीच्या गाड्यातील पोते उतरून घेण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नव्हती.

त्यामुळे लिलाव झाल्यानंतर वजन करून व्यापार्‍यांच्या गाड्यात मिरचीचे पोते रवाना झाले की, उरलेल्या शेतकर्‍यांच्या वाहनातील मिरचीचे पोते व्हेजिटेबल कपंन्यांकडून लिलावासाठी उतरून घेण्यात येत होते. त्यामुळे यार्डात रात्री दोन वाजेपर्यंत लिलाव सुरू होते. त्यात सुमारे 2 हजार क्विंटलपेक्षा अधिक मिरचीची आवक झाल्याची नोंद बाजार समितीकडे झाली होती.

LEAVE A REPLY

*