Blog : बालपणीची रम्य दिवाळी 

0
दिवाळीचा सण आला की सर्वांच्याच मनात एक आनंद, उत्साह संचारतो. काळानुसार दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल झाले असले तरी या उत्सवाचे नावीन्य, उत्साह आणि ‘राजे’पण तसुभरही कमी झाले नाही. विजयादशमीचा सण संपला की दिवाळीचे वेध लागतात.
माझे मनही मग याच काळात बालपणीच्या रम्य आठवणींमध्ये रमू लागते. मी माझ्या गावी साजरी केलेल्या दिवाळीचे क्षण मग मनात फेर धरु लागतात. त्या सुदंर आठवणींचा गोफ मनभर रुंजी घालू लागतो. माझे बालपण मराठवाड्यातील जालना या छोट्याशा शहरात गेले.
जिथे प्रचंड दगडी वाड्यामध्ये आम्ही चुलत भावंडे एकत्र जमून दिवाळी मोठ्या धुमधडाक्यात साजरी करत असू.
सहामही परीक्षा झाल्या की मग शाळेला दिवाळीच्या सुट्टया लागे. मग कपडे, फटाके, आकाश कंदिल आणि खुप मिष्ठान्न या गोष्टींसाठी मनात आनंदाचे तरंग उमटत.
फटाके आणण्याचे काम मोठ्या दादाकडे असे. १००-१५० रुपयांमध्ये भरपूर फटाके तर दोनशे अडिचशे रुपयांमध्ये चांगले कपडे मिळत. दादाकडे फटाक्यांची लिस्ट असे आणि मुलांच्या वयोगटाला शोभणारे आणि उडवतांना आनंद देणारे फटाक्यांची निवड करून तो स्वत: सर्व चुलत भावंडांना फटाके वाटप करत असे. नियोजन असे की दिवाळीचे चार दिवस पुरवले पाहिजे याबद्दल सांगत असे.
फटाके आणले तरी त्यामध्ये थोडासाही ओलसरपणा राहू नये म्हणून वाड्यावरच्या भव्य गच्चीमध्ये ऑक्टोबरच्या कडक उन्हात ते वाळवण्याचा प्रकार त्या वेळी आम्ही करत असू . आजच्या सारखा त्यिा काळी  दवाळीत पाऊस पडत नसे आणि साधारणत: ऑक्टोबर हिट संपल्यानंतर  नोव्हेंबरमध्ये दिवाळी येत त्यावेळी गुलाबी थंडीची चाहूल लागत असे.
धनत्रयोदशीला दिवाळीचा प्रारंभ होत. त्या पहिले वसुबासर असे परंतु दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे चार वाजता उठून कोण पहिल्यांदा बॉम्ब फटाका फोडणार यामध्ये चुरस लागलेली असे.
गुलाबी थंडीत डोळ्यावरीची झापडं सैल करून आम्ही बच्चे कंपनी पहाटे उठत असू. आणि पहिला फटाका फोडण्यासाठी गल्लीतल्या मोकळ्या जागेत जाऊन फटाका फोडण्यासाठी जात असू परंतु त्या आधी कुणीतरी मोठी भावंडे पहिला फटाका फोडून आमच्याकडे हास्यस्पद नजरेने पाहत आणि आमचा चेहरा हिरमुसला होई.
नरक चतुर्थीच्या दिवशी वडिल मंडळी पहाटे ४ वाजता ऊठून नभोवाणी केंद्रावर दर दिवाळीला प्रसारित होणारे ‘नरकासुराचा वध’ हे किर्तन लावत असे. हल्लीसारखे मोबाईल, इंटरनेट त्यावेळी नव्हते आणि प्रत्येक घरात टीव्हीचा शिरकाव झाला असला तरी दिवाळीची सुरुवात ‘आकाशवाणी’वरील नरकासुराच्या वध याच किर्तनाने होई.
वाड्यातील मोठ्या स्नानगृहात असलेल्या तांब्यांच्या बंबंामध्ये लाकडे टाकून पाणी तापवले जात. आणि पाषाणी चौरंगावर बसून तांब्यांच्या गंगाळामध्ये पाणी ओतून अंघोळीचा कार्यक्रम पार पडे.
गुलाबी थंडीत आई अंगाला तेल लावत आणि नंतर दाळीच्या पिठात हळद मिसळून केलेल्या विशेष दिव्यांनी ओवाळत असे. त्यावेळी चंदन, नागरमोथा यापासून बनवलेल्या उटण्यांचा वास आजही मनात सुंगध पसवून जातो. त्यानंतर सुवासिक तेलाने डोक्याला मालिश आणि मग खास दिवाळीत हमखास ठरलेल्या मोती साबणाने  मस्त अंघोळ करण्यात कोण मजा येत असे…? काही लहानगे सुर्योदयानंतर अंघोळ करत त्यावेळी त्याच्या अंगावर ‘नरक’ पडणार असे आम्ही चिडवत असू… त्या बालबुद्धीला नरक म्हणजे काय हे कधीच कळत नसे.
अंंघोळीनंतर घरातील थोरामोठ्यासोबत बसून चकली, अनारसे, लाडू, चिवडा अशा खाद्यपदार्थावर यथेच्छ ताव मारुन आम्ही बच्चे कंपनी वाड्यामध्ये वर्षांनंतर भेटलेल्या भावंडासोबत गप्पांची मैफल रंगवत. रात्रीला ओवाळून घेणे आणि फटाके फोडण्यासाठी धूम ठोकणे हे ठरलेले असे.
दिवाळीचा किल्ला बनवणे हा प्रकार हल्ली स्पर्धेपुरता मर्यादीत राहिला असला तरी त्यावेळी माती, दगड आणि पुठ्यांच्या वापराणे किल्ला तयार करण्याची मजा काही निराळीच होती. त्यासाठी सर्व भावंडे मिळून चौथीच्या पुस्तकातील शिवाजी महारांजाचे किल्ले समोर ठेऊन किल्ला बनवण्यासाठी एकत्र जमत असू.
मात्र कधी कधी खूप मेहनत करून किल्ल्याला हवा तसा आकार येत नसल्याने मन नाराज होत मग मोठ्या भावंडांची मदत घेऊन अखेर किल्ला रुपाला यायचा. मग त्यावर रायगड, शिवनेरी असे नामकरण करून शिपाई सजवाचे आणि तिन्हीसांजेला पणती, दिवा लाऊन लख्ख उजळवायचा असे ठरलेले… परंतु दिवाळीदरम्यान त्यामध्ये कुणाही फटाका लाऊन तो फोडायचा नाही ही मोठ्यांची सक्त ताकिद असे.
लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी लक्ष्मींपूजनाच्या वेळी घरातील लहान थोर एकत्र येऊन साग्रसंगीत पूजा करत असू. पूजा झाल्यानंतर आरतीच्या वेळी फटाक्यांची माळ फोडण्याची पद्धत असे. त्याकाळी लक्ष्मी बॉम्बला महत्व असे.(आज अशा प्रकारची चित्रे फटाक्यावर टाकण्यास ंबंदी आहे).
मात्र सुतळी बॉम्ब केवळ मोठ्या भावांच्या हाताने फोडला जात असे. मात्र त्यावेळी सुतळी बॉम्बच्या पाकीटावरील अत्यंत तोकडे कपडे घातलेली तरुणी हातात तोफगोळ्याची बंदुक असलेले चित्र का टाकले जाते असे बालसुलभ प्रश्‍न त्यावेळी आम्हाला पडत.
दिवाळीच्या चार दिवसांमध्ये धमाल असे परंतु कधी कधी दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आल्यामुळे एक दिवस दिवाळी कमी होत असे त्यामुळे आम्ही बच्चे कंपनी खूप नाराज होत असू कारण दुर गावांवरून वाड्यावर एकत्र जमलेली भावंडे लवकर घरी परत जाणार म्हणून मन हुरहुरत असे.तुळशीच्या विवाहासाठी फटाके बाजूला काढून दिवाळी संपत असे.
२०-२५ वर्षांपूर्वी  बालपणी साजरी केलेली ती दिवाळी मला आजही ‘नॉस्टेल्जिक’ करते. आठवणींच्या अवकाशात रमताना मन त्याकाळात जाते. तो भव्य वाडा, मोती साबणाने केलेली अंघोळ. ते सुंगधी तेल, उटण्याचा सुवास, वाड्यासमोरील ती भव्य सप्तरंगी रांंगोळी, वाड्याचा कानाकोपर्‍यात लावलेल्या पणत्यांनी उजळलेला तो वाड्यचा प्रत्येक भाग आणि भावंडाचे तो स्नेह, जिव्हाळा, आपुलकी….
आज सारी भावंडे कामानिमित्त देशोविदेशात विखुरलेली….! कधी परत येईल ती बालपणीची रम्य दिवाळी? आज सारे काही बदलेले आहे. दिवाळी साजरी करण्याची पद्धतीही बदलेली आहे. आमच्या खिश्यात पैसा आहे. परंतु चुलत भावंडासोबत त्या काळी साजरी केलेली भव्य दगडी वाड्यातील ती दिवाळी मला दिवाळीच्या पूर्वसंध्येला लख्ख आठवते.
जणू काही सर्व कालच घडले याप्रमाणे….! तो मातीचा किल्ला, नातेवाईकांची रंगलेली मैफल, वाड्याच्या गच्चीतून अलगत बांबूंच्या काठीवर लटकवलेला चांदणीच्या आकाराचा आकाश कंदिल, लाल मातीच्या पणत्या, घरी बनवलेल्या मिष्ठान्नांचा सुवास, भावंडांचा हवाहवासा सहवास आणि बरेच काही……!
आज नाशिकच्या व्यग्र आणि गतीमान आयुष्यात आणि उंच घरांच्या संस्कृतीत बालपणी मी साजरी करत असलेली दगडी वाड्यातील दिवाळीला अनुभवलेले ते दिवस परत येतील का? आज हजारो रुपयांचे कपडे आणि फटाके खरेदी करून बालपणीचा तो निरागस आनंद पुन्हा मला मिळेल का? आकाशवाणी केंद्रावरुन नरकचतुर्थीला नरकासुराचा वध सांगणारे किर्तन मला त्या लाकडी फिलिप्सच्या रेडीओवरून पुन्हा ऐकता येईल का?
सुतळी बॉम्बच्या पाकीटावर अर्धवस्त्रात गण हातात घेतलेल्या त्या मादक तरुणीचा फोटो का टाकला असेल हा बालसुलभ प्रश्‍न मला पुन्हा पडेल का? माडीवरल्या दिवाणखाण्यातून जुन्या नभोवाणीसंचातून येणारा ‘लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’हा शांताराम बापुच्या ‘शेजारी’ चित्रपटातील गाणे मला पुन्हा ऐकता येईल.? बालपणी चुलत भावंडासोबत भव्य दगडी वाड्यातील‘चंद्रविहार’ मधील ती दिवाळी माझ्या पुढच्या पिढीला पुन्हा अनुभवता येईल?
आजची मुलं महागड्या गॅझेटस्मधून चंदेरी पणत्यासोबत व्हच्यूर्ंअल जगात रंमली आहेत. त्यांना त्या दिवाळीचा आनंद शब्दातून तरी घेता येईल का? उत्तरे मला मिळात नाही.. तुम्हाला मिळतात का ते बघा.. कालाय तैस्म नम: दुसरे काय?
एक नक्की येत्या दिवाळीत शुभेच्छा एक दीप उजळू द्या वंचितांच्या, उपेक्षीतांच्या  मनात आणि दारात…ज्यांनी कधीच दिवाळीचा आनंदी प्रकाश पाहिला नाही… काही रक्कम त्यांच्यासाठी द्या ज्यांनी कधी भव्यदिव्य दिवाळी, फटाके, नवे वस्त्र आणि मिष्ठान्न कधी भरभरून पाहिले नाही….
              उटण्यांचा सुवास, मिष्ठांन्नांचा गोड वास
            आप्तेष्ठांचा हवाहवासा सहवास
             येत्या दिवाळीत प्रकाशीत व्हावा
             उपेक्षितांचा मनाचा प्रत्येक कोपरा .
             तुमच्या प्रेमाने हमखास… !
                      शुभ दीपोत्सव.. !

LEAVE A REPLY

*