‘पालक’ मुख्यमंत्री रविवारी नाशकात

महापालिका विकासकामांसाठी होणार २००० कोटींची मागणी

0
नाशिक | दि. २५ प्रतिनिधी- मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नाशिक महापालिका निवडणुकीत प्रचारात दत्तक विधान करीत भाजपने बहुमताने महापालिका जिंकली. नाशिक शहर विकासाचे पालकत्व घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री नाशिक महापालिकेत रविवारी (दि.२८) येत आहेत.
त्यांच्या उपस्थितीत अधिकार्‍यांची बैठक होणार असून यात शहर विकासाकरिता सुमारे २ हजार कोटी रुपयांची मागणी प्रशासनाकडून केली जाणार आहे. या दौर्‍यानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून नाशिककरांच्या पदरात काय पडते, याची उत्सुकता लागली आहे. नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी प्रचार सभेत नाशिकला दत्तक घेऊन शहराचा विकास करू, असे विधान केले होते.

त्यानंतर नाशिककरांनी भाजपला भरभरून पाठिंबा दिल्याने महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. महापालिकेची सूत्रे भाजपच्या हातात आल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांची जबाबदारी काहीशी सोपी झाली आहे. निवडणुकीनंतर महापालिकेवर वाढत असलेल्या दायित्वाच्या आकड्यामुळे विकासकामे थंडावली आहेत. स्मार्ट सिटी, अमृत योजना व इतर राज्य, केंद्रांच्या योजनांसाठी महापालिकेला स्वनिधीतून आपला हिस्सा द्यावा लागणार आहे.

यातच उत्पन्न केवळ १ हजार कोटींच्या आत असून एलबीटी बंद होणार असल्याने केंद्राच्या अनुदानावर विकासकामे करावी लागणार आहेत. या एकूणच पार्श्‍वभूमीवर महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक बनली असून मागील महिन्यात अधिकारी, कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी महापालिकेला आपली मुदत ठेव मोडावी लागली होती.

या एकूणच पार्श्‍वभूमीवर नाशिककरांचे पालक बनलेल्या मुख्यमंत्र्यांना शहरातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, विविध संघटनांनी काही विकासकामे व प्रश्‍नांसाठी साकडे घातले होते. यामुळेच आता नाशिकचे पालक मुख्यमंत्र्यांनी येत्या रविवारी (दि.२८) दुपारी १२.३० वाजता महापालिका अधिकार्‍यांसमवेत पहिली बैठक लावली आहे.
नाशिक महानगराच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठक महापालिकेत लावल्यामुळे आता नाशिककरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मागील पंचवार्षिक काळात मनसेनेकडून ठोस कामे व नवीन प्रकल्प असे महापालिकेकडून झाले नव्हते. जी काही मोठी कामे झाली ती सीएसआरअंतर्गत झाली होती. त्यामुळेच नाशिककरांची नाराजी निवडणुकीतून दिसली होती. त्यामुळे आता भाजपच्या सत्ता काळात शहराच्या विकासात भर पडेल, स्मार्ट सिटीत मोठी कामे होतील, अशी अपेक्षा नाशिककरांची आहे.

आता नाशिकमधील भाजपचे तीन आमदार, शहरात वास्तव्य करणारे इतर भाजपचे दोन आमदार, एक खासदार आणि पदाधिकारी आता आपल्या दत्तक नाशिकच्या विकासासाठी पालकाकडे काय मागणार, हे मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यातून दिसणार आहे. मात्र नाशिक महापालिकेतील विकासकामांच्या निमित्ताने प्रशासनाकडून २ हजार कोटी रुपयांची मागणी करणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात नाशिककरांच्या पदरात काय पडणार, याचे उत्तर रविवारी मिळणार आहे.

LEAVE A REPLY

*