मुख्यमंत्र्यांचे आरोप बिनबुडाचे, राष्ट्रवादीची माफी मागावी – चित्रा वाघ

0
नाशिक | सरकारच्या मी लाभार्थी या जाहिरातीची पोलखोल झाल्यानंतर टिव्हीवरील एका मुलाखतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्रयांनी सदर महिलेला राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षांनी धमकावल्याचा गंभीर आरोप केला आहे. याची शहानिशा करण्यासाठी कळवणमधील मोहमुख गावात आम्ही जावून आलो असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगितले. याप्रकरणी मुख्यमंत्रयांनी राष्ट्रवादीची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

जाहिरात संदर्भात सत्य समोर आल्याने खजिल झालेले मुख्यंमंत्री आपला राग, विरोधकांवर काढतांना दिसताहेत. एका बाजूला महिलांचा आम्ही सन्मान करतो असे म्हणायचे आणि दुसरया बाजूला खालच्या पातळीवर जावून राजकारण करतांना ते दिसत आहेत.

त्यांचेच मंत्री गिरीश महाजन यांनी दारूच्या ब्रॅण्डला महिलांची नावे द्यावीत असे वक्तव्य करून महिलांचा अपमान केलेला आहे. यासाठी आम्ही तीन दिवस जोडे मारो आंदोलनही केले आहे. मुख्यमंत्रयांनी दोन दिवसात माफी न मागितल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासही मागे पुढे पाहणार नसल्याचे वाघ यांनी सांगितले. महिला आयोगाने गिरीष महाजन यांच्या प्रकरणी गुन्हा का नोंदविला नाही.

विजया रहाटकर यांनी याचे उत्तर द्यावे. कायद्यात याबाबत तरतूद असूनही का पाउले उचलण्यात आलेली नाहीत. महिला आयोग हा केवळ नावालाच शिल्लक राहिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सरकारच्या लाभार्थी च्या शौचालय जाहिरातीत सहभागी असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील मोहमुख येथील फुनाबाई गुलाब पवार हिस धमकवण्याचे तिच्यावर दबाव टाकल्याचे गंभीर आरोप मुख्यमंत्री नी राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्ष संदर्भात केलेत ते चुकीचे आहेत.

याचं संदर्भात आज मी स्वत:,माझ्यासोबत महिला उपाध्यक्ष डॉ.भारती पवार,जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे,प्रदेश सचिव कामिनी जाधव यांनी फुनाबाई ची भेट तेथील गावकर्यांसमोर भेट घेतली असतां असा कुठलाचं प्रकार राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षचं काय पण कुठल्या कार्यकर्त्यानेही केलेला नाही असा खुलासा स्वत: फुनाबाई व गावकर्यांनी केला.

याचाच अर्थ मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही पद्धतीची शहनिशा,खातरजमा न करता विरोधी पक्षातील महिला पदाधिकारीची बदनामी केली आहे.अशा पद्धतीने राज्यातील महिलांची बदनामी करणे हे राज्याच्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांना शोभत नाही असेही त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

*