मुख्यमंत्री पुणतांब्याला येणार

0

पुणतांब्यातील दुसर्‍या गटाने घेतली फडणवीस यांची भेट

मुंबई, पुणतांबा (प्रतिनिधी) – शेतकरी संपाचे आंदोलन करणार्‍या पुणतांबा येथील शेतकर्‍यांशी संवाद साधण्यासाठी मी पुणतांबा येथे लवकरच येणार आहे, असे ठोस आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणतांबा परिसरातील 40 गावांतील शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. मंगळवारी दुपारी 4 वाजता पुणतांबा येथील किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव, किरण सुराळकर, संदीप गिड्डे, शंकर दरेकर, योगेश रायते यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली.
शिष्टमंडळात पुणतांबा गावचे उपसरपंच प्रशांत वाघ, ग्रामपंचायत सदस्य अभय धनवटे, बाळासाहेब गगे, नितीन सांबारे, गणेश बनकर, दीपक वहाडणे, दत्ता जाधव, संभाजी गमे, संतोष आगरे, भाऊसाहेब सोनवणे, चंदू वाटेकर, दादा सांबारे आदींसह अनेक मान्यवर सहभागी होते.
राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा क्रांतिकारक व धाडसी निर्णय घेतल्याबद्दल शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. तसेच सोयाबीन व कांद्याचे अनुदान व कर्जमाफीबाबतचा निर्णय 30 जून 2017 पर्यंत गृहीत धरावा अशी मागणी केली. तसेच सरसकट कर्जमाफीच्या निर्णयातील जाचक अटी व निकष बदलावेत अशी मागणी केली.
मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी शिष्टमंडळातील शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणतांबा येथे शेतकर्‍यांशी संवाद साधण्यासाठी यावे असे आग्रहाचे निमंत्रण शिष्टमंडळातील सर्वच शेतकर्‍यांनी दिले. यावेळी मी लवकरच पुणतांबा येथे येणार असल्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव व किरण सुराळकर यांनी दिली आहे. मंगळवारी वैजापूर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळानेही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

स्वस्तात वीज, सुरुवात राळेगणमधून…
वीजबिल माफ करण्याची मागणी नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांनी केली आहे. याबाबतही मुख्यमंत्र्यांनी नवा पर्याय शेतकर्‍यांना सुचविला. शेतीसाठी सोलर फिडर आणू. त्यामुळे शेतकर्‍यांना कमी दरात वीज मिळेल. त्याची सुरुवात राळेगणसिद्धीतून होईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. 

 

LEAVE A REPLY

*