समृद्धी महामार्ग होण्यावर मुख्यमंत्री ठाम; मेक इन नाशिक कार्यक्रमात केली भलामण

0
मुंबई (पंकज जोशी ) | वरळीच्या नेहरू सेंटर मध्ये सुरू असलेल्या मेक इन नाशिक कार्यक्रमात नाशिकच्या उद्योगविस्ताराला चालना देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले खरे पण समृद्धी महामार्गाला सिन्नरसह राज्यातील शेतकऱ्यांकडून होत असलेल्या विरोधाची सल मात्र त्यांच्या संभाषणातून प्रकट झालीच.

नाशिकसह राज्याच्या गतिमान विकासासाठी समृद्धीसारख्या महामार्गांची कशी महत्वाची भूमिका असते याचे गुणगान करत समृद्धीला नाशिककरांनी पाठिंबा द्यावा अशी सूचक विनंती त्यांनी यावेळी केली.

मेक इन नाशिक सारख्या उद्योग विकासाला चालना देणाऱ्या कार्यक्रमाची त्यांनी यावेळी स्तुती केली खरी, पण या विकासासाठी पायाभूत सुविधांचे मजबुतीकरण होण्याची गरजही बोलून दाखविली. त्यातील महत्वाचा विकास हा समृद्धी मार्गामुळेच साधणार आहेे, यावर त्यांनी वारंवार जोर दिल्याने समृद्धी महामार्गाबद्दल मुख्यमंत्री आग्रही असल्याचे स्पष्ट झाले.

औरंगाबाद नंतर नाशिक येथेही केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी ड्राय पोर्टसाठी घोषणा केली. नाशिकच्या उद्योग विश्वातील निर्यात सुविधमध्येे महत्वाची भूमिका ड्रायपोर्टची असणार आहे. मात्र त्यासाठी चांगल्या आणि वेगवान महामार्गांची कशी गरज असणार? हा मुद्दा मुख्यमंत्री महोदयांनी उपस्थित नाशिककर उद्योजक आणि पदाधिकाऱ्यांना थोडक्यात पण मुद्देसूद समजावून सांगत समृद्धी महामार्गाला अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा देण्याचे सूतोवाच केले.

दरम्यान दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नाशिकला आले तेव्हाही त्यांनी समृद्धी महामार्ग होण्यावर भर दिला होता. तर त्याचवेळी समृद्धी महामार्गाला विरोध करत मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

LEAVE A REPLY

*