मुख्यमंत्री, शरद पवार आज नाशकात

0
नाशिक | दि. २७ प्रतिनिधी- स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा जन्मोत्सव सोहळा उद्या (दि.२८) भगूर आणि नाशिक येथे विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. या उत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भगूर येथे सकाळी ९ः१५ वाजता अग्निकुंड प्रज्वलित करून करण्यात येणार आहे.

भाजपच्या वतीने संपूर्ण देशभरात सावरकर जयंती उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यापार्श्‍वभूमीवर नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिली.

या उत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या जन्मस्थळी भगूर येथे त्यांची पुस्तके, त्यांच्यावरील गीते, त्यांच्या विचारांचा पुनरुच्चार, त्यांच्यावरील छायाचित्र प्रदर्शन यांचा आविष्कार उपस्थितांना घडणार आहे. या कार्यक्रमासाठी सकाळी ८ः४५ वाजता मुख्यमंत्र्यांचे नागपूरहून भगूर येथे आगमन होणार आहे.

यानंतर ते सावरकर स्मारकात अग्निकुुंड प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. या सोहळ्याच्या उद्घाटनानंतर भगूर आठवडे बाजाराच्या पटागंणावर मुख्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शत जन्म शोधिताना हा सावरकरांच्या गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

यानंतर मुख्यमंत्री उपस्थितांना संबोधित करतील. या कार्यक्रमानंतर ११ः३० वाजता मुख्यमंत्री नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतकमहोत्सवानिमित्त नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश मीडियम स्कूलमधे उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते शाळेच्या सभागृहाचे नामकरण आणि शतक महोत्सव प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमानंतर दुपारी १ वाजता मुख्यमंत्री नाशिक महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथे महापालिकेत भेट देऊन शहर विकासाचा आढावा घेणार आहेत. २ वाजता ते गोल्फ क्लब विश्रामगृह येथे त्यांचे आगमन होणार आहे. २ः३० वाजता नगरसेवकांच्या कार्यशाळेला ते संबोधित करतील. ४ वाजता ते ओझर येथून मुंबईकडे रवाना होतील.

पवार यांची आज प्रकट मुलाखत
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत उद्या (दि.२८) रोजी सायंकाळी ६ वाजता विश्‍वास लॉन्स येथे होणार आहे. पवार यांच्या सुवर्ण महोत्सवी संसदीय कारकिर्दीचा गुणगौरव करतानाच कायदेमंडळातील पाच दशकांच्या कार्याचा वेध घेतला जाणार आहे.

सुप्रसिद्ध लेखक अंबरीश मिश्र, निवेदक सुधीर गाडगीळ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता सराफ हे पवार यांची मुलाखत घेणार आहेत. पवार यांच्या अष्टपैलू कर्तृत्वाचा अभ्यासपूर्ण वेध यावेळी घेतला जाणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक, यांच्या वतीने होणार्‍या या मुलाखतीत शरद पवार यांचा जाहीर सन्मान कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.

दरम्यान या कार्यक्रमप्रसंगी शिवदास डागा यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. डागा हे व्यवसायाने चार्टर्ड अकौंटंट असून गेल्या पन्नास वर्षांत सामाजिक जाणिवतेचे भान बाळगून त्यांनी समाजकार्यास हातभार लावला आहे. या कामात त्यांनी अनेक चढ-उतार अनुभवले आहे. या अनुभवांचे वर्णन ‘अजुनी चालतो मी पाऊलवाट…’ या आत्मचरित्रातून त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*