शिर्डी : मुख्यमंत्र्यांनी 800 कोटी दिले; ते कुठे गेले?

0

शिर्डीकरांसह साईभक्तांचा सवाल : शिर्डीचा विकास कधी होणार

शिर्डी (प्रतिनिधी) – साईबाबा समाधी सोहळ्यानिमित्त मंजूर 3 हजार कोटींच्या विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील 800 कोटी रूपये विकास कामांसाठी वितरीत केल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शताब्दी सोहळ्याच्या ध्वजारोहण प्रसंगी केले.
मात्र शिर्डीत विकास कामांची एक विटही अद्याप लावण्यात आली नाही. प्रशासनाला राष्ट्रपती दौर्‍यादरम्यान साधा डिव्हायडरचा रंगही बदलता आला नाही, मग मुख्यमंत्र्यांनी दिलेले 800 कोटी रुपये कुठे गेले? असा प्रश्‍न शिर्डीकरांसह साईभक्तांनाही पडला आहे.
साईबाबा समाधी सोहळा जागतिक दर्जाचा व्हावा यासाठी गेल्या सहा महिन्यापांसून राज्य शासनासह साईबाबा संस्थान प्रयत्नशिल आहे. शताब्दी सोहळ्यासाठी न्यायालयाच्या आदेशाने संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी आय. एस. अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली.
संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, समाधी शताब्दी सोहळा समितीचे सदस्य तसेच विश्‍वस्त यांच्या समवेत बैठक घेवुन मुख्यमंत्र्यांनी 3 हजार कोटीच्या विकास आराखड्यास मान्यता दिली. पैकी 1800 कोटी संस्थानच्या स्वनिधीतून तर उर्वरित रक्कम राज्यशासन देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
1 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिर्डी विकास आराखड्यासाठी पहिल्या टप्प्यातील 800 कोटी रूपये दिल्याचे सांगितले. मात्र शिर्डी शहरात आजपर्यंत एकही भरीव विकास काम झाले नसल्याचा खुलासा शिर्डी ग्रामस्थांनी केला आहे.

शताब्दी सोहळ्याला ग्रहण लागले असून शिर्डीचा विकास ठप्प झाला आहे. विकास आराखड्यातील एक रुपयाही आजपर्यंत शिर्डीला मिळालेला नाही. शताब्दी सोहळ्यासाठी गठीत केलेली समितीही याबाबत गंभीर नाही. घोषणांचा पाऊस पाडणारे सरकार म्हणून भाजपाची प्रतिमा तयार झाली आहे. 800 कोटी शिर्डी विकासासाठी दिल्याचा दावा करणार्‍या शासनाने हे पैसे कुठे व कोणत्या कामासाठी वितरीत झाले, याचा हिशोब जनतेला द्यावा.
-नितीन उत्तम कोते, शिर्डी ग्रामस्थ

3200 कोटी रूपयांच्या शिर्डी विकास आराखड्याला मान्यता मिळाली आहे. यातील 1800 कोटी रूपये साईबाबा संस्थान स्वनिधीतून खर्च करणार असल्याचे कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी ‘सार्वमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान संस्थानने आत्तापर्यंत विकास आराखड्यातील किती रक्कम कुठे खर्च केली, याची माहिती कनिष्ठ अधिकार्‍यांकडून महिती घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यानुसार संस्थानच्या प्रशासकीय विभागातील अधिकार्‍यांकडे याबाबत विचारणा केली, मात्र त्यांनी याविषयावर बोलण्यास असमर्थतता व्यक्त केली.

1 ऑक्टोबरपासून साईबाबा समाधी शताब्दी उत्सवाला प्रारंभ झाला. मात्र अद्याप शिर्डी विकासासाठी मंजूर विकास आराखड्यातून एक रूपयाही खर्च झाला नाही. साईबाबा संस्थान किंवा राज्यशासनाने शिर्डी नगरपंचायतीला विकास कामांसाठी एक रूपयाही दिलेला नाही. अनेक विकास कामे प्रलंबित आहे. स्वचछता करापोटी संस्थानकडून पालिकेला 25 लाख रूपये घेणे आहे, तेही संस्थानने अद्याप दिले नाही. निधीच नसल्याने पालिकेला अद्याप एकही विकास काम करता आले नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 800 कोटी रूपये कोणाला दिले याची माहिती नाही.   – सौ. योगिता शेळके, नगराध्यक्षा शिर्डी नगरपंचायत

LEAVE A REPLY

*