मुख्यमंत्री विश्रामगृहाकडे आलेच नाहीत; पदाधिकार्‍यांची घोर निराशा

0
नाशिक : मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन समस्या मांडणे, निवेदन देऊन अडचणी सांगणे, मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणे अशा विविध कारणांसाठी गोल्फ क्लब मैदान येथे सकाळपासून थांबलेले पक्षीय पदाधिकारी तसेच विविध संघटना, संस्थानच्या पदाधिकार्‍यांची मुख्यमंत्री तिकडे न फिरकल्याने घोर निराशा झाली.

मुंबईत महत्त्वाची बैठक असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी महापालिका आढावा बैठकीनंतर पुढील सर्व कार्यक्रम रद्द करत मुंबईला रवाना होण्यासाठी थेट ओझर विमानतळाकडे धाव घेतली. यामुळे गोल्फ क्लब मैदान येथील विश्रामगृहावर भाजप नगरसेवकांची आयोजित बैठक रद्द करण्यात आली. तत्पूर्वीच वेळेअभावी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारे आडगाव पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रद्द करण्यात आले होते.
सकाळी भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मोत्सवास हजेरी लावलेल्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. परंतु या सर्वांना दुपारी नगरसेवकांच्या बैठकीनंतर भेटीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या वतीने देण्यात आले होते. यामुळे कर्जमुक्ती, समृद्धी महामार्गास विरोध करणारे शेतकरी, राष्ट्रीय दारुबंदी मंचचे पदाधिकारी, अंध व अपंग संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, व इतर संचालक, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी असे सुमारे 15 ते 20 पक्षसंघटनांचे पदाधिकारी सकाळी 11 ते दुपारी 2.30 पर्यंत मुख्यमंत्र्यांची वाट पाहत विश्रामगृहावर बसून होते.
परंतु महापालिकेतून परस्पर मुख्यमंत्री थेट विमानतळाकडे रवाना झाल्याने त्यांच्यासाठी सुमारे तीन ते चार तास बसलेल्या सर्व पदाधिकार्‍यांचा हिरमोड झाला. अखेर चरफडत सर्वजण तेथून निघून गेले.

LEAVE A REPLY

*