Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

नक्षलवाद्यांंशी चकमक; 17 जवान शहीद

Share

रायपूर । दि.22 वृत्तसंस्था

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे 17 जवान शहीद झाले. त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. छत्तीसगड पोलिसांनी ही माहिती दिली. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर भागातील चिंतागुफा पोलीस ठाणे क्षेत्रात शनिवारी सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली. यात अनेक नक्षलवादी ठार झाले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, कोजारगुडाच्या डोंगर भागात झालेल्या या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचे 14 जवान जखमी झाले होते. तर यादरम्यान अनेक नक्षलवादी ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला.

पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीनंतर सुरक्षा दलाचे 17 जवान बेपत्ता होते. या बेपत्ता झालेल्या जवानांच्या शोधासाठी मोठ्या संख्येने पथके जंगलांमध्ये रवाना झाली.रविवारी सकाळी शोध पथकांच्या मदतीसाठी सुरक्षा दलाच्या जवानांनाही पाठवण्यात आले. शेवटी या शोधमोहिमेत सुरक्षा दलाच्या 17 जवानांचे मृतदेह सापडले.

नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांना भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. चौहान यांनी ट्विट करत म्हटले की, सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अनेक वीर सुपुत्र शहीद झाल्याचे वृत्त ऐकून मी अतिशय दु:खी झालो आहे.

दिवंगत आत्म्यांना शांती लाभावी आणि त्यांच्या कुटुंबियांना हा वज्राघात सहन करण्याची सहनशक्ती मिळावी यासाठी मी ईश्वराकडे प्रार्थना करत आहे. विनम्र श्रद्धांजली! देश आपल्या सुपुत्रांचे बलिदान विसरणार नाही, या निर्दयींना धडा शिकवणार.

Leave a Comment

error: Content is protected !!