भुजबळ काका पुतण्यास जामीन मंजूर – पुन्हा ट्रेंडमध्ये

0
नाशिक | राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि येवल्याचे विद्यमान आमदार छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांना ५० हजारांच्या जामिनावर सुटका झाली असल्याची माहिती सध्या नाशिकच्या ट्रेंडमध्ये पुन्हा एकदा आली आहे.

मात्र अजून जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्जच केलेला नाही, तर जामीन मिळणार तरी कसा? असा प्रतिप्रश्न भुजबळांच्या निकटवर्तीयांकडून विचारण्यात येत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सध्या फिरत असलेली भुजबळांच्या जामिनाची बातमी निव्वळ अफवा असल्याचे समोर येत आहे.

गेल्या दीड वर्षांपासून आ. छगन भूजबळ व माजी खासदार आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने त्यांची चौकशी सुरु केली. यामुळे त्यांची रवानगी सध्या ऑर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे.

मागच्या महिन्यात १८ डिसेंबरला भुजबळांच्या जामिनावर सुनावणी करण्यात येणार होती. त्याच दिवशी जामीन मिळण्याची दाट शक्यता होती.

यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता तसेच अधिवेशन सुरु असताना राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेतेही सुनावणीसाठी मुंबईला कोर्टात हजर होते. परंतु सक्त वसुली संचालनालयाने  भुजबळांच्या जामिनाला प्रखर विरोध केला होता.

मात्र, १८ डिसेंबरच्या सुनावणीत भुजबळ काका पुतण्याचा अर्ज फेटाळला होता. यानंतर मात्र सर्व नेते आणि कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांनतर भुजबळ समर्थकांचा विराट मोर्चाही काढण्यात आला होता. अद्याप भुजबळांनी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केलेला नाही. त्यामुळे अचानक जामीन मिळू शकणार नसल्याचे चित्र आहे.

अशातच सध्या सोशल मिडीयावर भुजबळांच्या जामिनाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. नाशिक परिसरातदेखील सोशल मीडियातून या व्हिडीओतून पसरवला जात आहे. याच व्हिडीओमुळे काल एका वृत्तवाहिनीने भुजबळांच्या जामिनाविषयी वृत्त प्रसारित केले होते.

त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र आज छगन भुजबळ यांच्या जामिनाबाबतच्या कुठल्याही वृत्ताला त्यांच्या निकटवर्तीयांनी दुजोरा दिला नसून उलट त्यांनीच सांगितले की अद्याप जामीन अर्जच दाखल केलेला नाहीये तर जामीन कसाकाय मिळणार. हा विरोधकांचा खोडसाळपणा असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.

 

LEAVE A REPLY

*