रसायनाने पिकतोय आंबा!

0

सोमनाथ ताकवाले | नफेखोरी आणि जादा पीक कमी कालावधीत खपवण्याची उर्मी ग्राहकांच्या जीवावर कशी बेतू शकते, याचे उत्तम उदाहरण कृत्रीमरित्या पिकवल्या जाणार्‍या आंबा प्रक्रियेमुळे समोर येत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या जीवाशी खेळ करण्याचा उद्योग मार्केट यार्डात सुरु आहे.
शहरात फिरत्या विक्रेत्यांकडे, फळविक्रेत्यांकडे पिवळा धमक हापूस, लंगडा, केशरी, राजापुरी, कलमी आंबा बघून कोणालाही तो आकर्षित करेल, असा दिसत आहे. सध्या शहरातील प्रत्येक बाजारपेठेत आणि प्रत्येक मार्गाच्या कोपर्‍यावर असलेल्या फळविक्रेत्यांकडे इतर फळांपेक्षा आंब्याची आवकच अधिक आहे. कारण त्यांचे झालेले सर्वाधिक उत्पन्न बाजारपेठ व्यापण्यास कारण ठरलेले आहे. ग्राहकही खूप असल्याने आणि पावसाळा तोंडावर आल्याने बाजारात येणार्‍या कैरी स्वरुपातील आंब्यांचे पिकलेल्या स्वरुपात रुपांतर करून विक्री करण्यासाठी चुकीचा मार्ग वापरला जात आहे. त्यामुळे थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे.
आंबा उत्पादकांकडून ट्रकच्या -ट्रक हापूस, केशर, राजापुरी, लंगडा आदी आंब्यांच्या कैर्‍या खरेदी करून त्या मार्केट यार्डातील गाळ्यात किंवा इतरत्र असलेल्या गोडावून (कोटा)मध्ये उतरून त्या अवघ्या सहा ते आठ तासात पिकवण्याचा कृत्रिम मार्ग आंबा व्यापार्‍यांकडून अवलंबला जात आहे. त्यामुळे शहरात याच व्यापार्‍यांकडून येणारा आंबा बहुतांश किरकोळ फळविक्रेत्यांकडे वितरित होत आहे. अशा आंब्याची चव चाखल्यानंतर ग्राहकांना पोटदूखी , अपचन, जुलाव, उलट्या आणि पोटाचे विकार जडत आहे. त्यामुळे आंबा खाणार्‍यांमध्ये विकतचे दूखणे घेतले असा सूर उमटू लागला आहे.
यंदा आंब्याचे उत्पन्न विक्रमी झालेले आहे. त्याला कारण म्हणजे अनुकूल वातावरण, नैसर्गिक संकटांचा अभाव होता. त्यामुळे प्रत्येक बाजारपेठेत आब्यांची आवक विपुल झालेली आहे. ती एवढी झाली की, आंब्यांने द्राक्षांची बाजारपेठ गडप केलेली आहे. द्राक्षांपेक्षा परवडणारे दर आणि द्राक्षांचा हरवलेला गोडवा, यामुळे बाजारपेठेत ग्राहकांनी आंब्याला पसंती दिली होती. ही खरेदीची क्रेझ लक्षात घेऊन व्यापार्‍यांनी आंबा अधिक प्रमाणात विक्रीला आणून त्यातून व्यवसायवृद्धीचा मार्ग हंगामात पत्करलेला आहे.

मात्र आंबा विकवण्याची नैसर्गिकरित्या असलेली ४ ते ६ दिवसांची पद्धत दूर करून कृत्रिमरित्या चार ते सहा तासात आंबा पिकवणारी पद्धत अवलंबली आहेे. त्यामुळे आंबा तर रात्रीतून पिवळाधमक निपतज आहे. मात्र त्यावर शिंपडण्यात येणारे रसायन आंब्याच्या गाभ्यात उतरत असल्याने त्यांचे अंश आंबा खाणार्‍यांच्या पोटात जावून घात करीत आहे. त्यामुळे पोटविकार वाढीस लागत आहे.
असा पिकतोय आंबा
मार्केट यार्डात आवक होणार्‍या आंब्यांची परराज्यातील व्यापार्‍यांनी गाळे घेऊन तेथे आंबे उतरून घेण्याची व्यवस्था केेलेली आहे. दिवसाला येणार्‍या आंब्यांच्या गाड्या गाळ्यात खाली करून घेण्यासाठी परराज्यातील मजुराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सकाळी-सकाळी उतरून घेतलेल्या आंब्यांची प्रतवारी करण्यासाठी पुन्हा गाळ्याचे शटर बंद केले जाते. या बंद दाराआड परप्रांतीय मजुरांचे कृत्रिम आंबा पिकवण्याचे कार्य सुरु होते. व्यापार्‍यांकडून मजुरांना विशिष्ट रसायनाची बाटली सुपूर्द केली जाते. त्याचबरोबर पाण्याच्या बादल्या, स्प्रे गण, आंबा भरण्यासाठी प्लास्टिक क्रेट दिले जातात.
पाण्याच्या बादलीत रसायन थेट टाकण्यात येतात. नंतर ते पाणी बाटलीत भरून त्याला स्प्रेगन जोडून घेतली जाते. प्लास्टिक क्रेटमध्ये आंबा प्रतवारी करताना एक-एक थर झाला की, त्यावर रसायनयुक्त पाण्याचा स्प्रे शिंपडण्यात येतो. त्यावर पुन्हा थर, त्यानंतर पुन्हा स्पे्र असे करीत पूर्ण जाळीतील आंब्यांवर रसायन फवारण्यात येते, ते क्रेट एका बाजूला सरकून पुन्हा याच पद्धतीने भरलेल्या आंब्यांच्या क्रेटचा थर त्यावर रचण्यात येतो. सकाळी दहा वाजेच्या दरम्यान सुरु झालेले हे काम गाळ्यात दुपारी संपवण्यात येते.

त्यांनतर गाळा बंद करून दुसर्‍या दिवशी पहाटे-पहाटे किरकोळ व्यापार्‍यांना माल विकण्यासाठी बाहेर काढण्यात येतो. अतिशय पिवळेधमक आणि डोळ्यांना आकर्षिक करणारे आंबे प्लास्टिकच्या क्रेरेटमध्ये विक्रीस तयार झालेले असतात. ते खरेदी करण्यासाठी किरकोळ व्यापार्‍यांच्या उड्या पडतात. अवघे चार ते सहा तासात रसायनाच्या मदतीने कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा सर्व बाजारपेठेत विक्री होण्यास रवाना होतो.
यार्डात २५ ते ३० गाळ्यांमध्ये आंबा कृत्रिमरित्या रसायनाच्या मदतीने पिकवण्याचा गोरख धंदा दररोज सुरू आहे. त्यामुळे यार्डात दररोज आवक आणि आंंबा खपण्याचे प्रमाण अधिक आहे. नफेखोरीसाठी आंबा पिकवण्याचा कालावधी नैसर्गिक पद्धत डावलून कृत्रिम पद्धत अवलंबून अवघ्या काही तासावर आणण्यात आलेला आहे. त्यामुळे आंबा वरून एकदम पिकलेला दिसत असला तरी आतमधील गर गुठळीयुक्त आणि बेचव, गोडवा हरवलेला असतो

. अशा प्रकारचे आंबे खाण्यात आल्याने पोटाचे दुखणे वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर लहान मुले, वृद्ध यांना कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याचे दुष्परिणाम भोगावे लागत असल्याचे आढळत आहे. याकडे अन्न, औषध प्रशासन विभाग लक्ष देईल का, असा सवाल ग्राहकांकडून केला जात आहे.

LEAVE A REPLY

*