छावण्या घोटाळा : जिल्ह्यात होणार फौजदारी

0

जिल्हाधिकार्‍यांनी दिले तहसीलदारांना आदेश, घोटाळाबाजांचे धाबे दणाणले

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात 2012-13 व 2013-14 अशा दोन वर्षे पडलेल्या दुष्काळात नगर, बीड, सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पशूधन वाचवण्यासाठी चारा छावणी, चारा डेपो सुरू करण्यात आले होते. त्यात कोट्यवधी रुपयांची अनियमितता, गैरप्रकार झालेला आहे. या प्रकरणी राज्य सरकारने नगरसह चारा छावणी आणि चारा डेपो सुरू केलेल्या जिल्ह्यातील चालकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे घोटाळाबहाद्दरांचे धाबे दणाणले आहेत.

 

सप्टेंबर महिन्यांत राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या या आदेशावर नगर जिल्हा प्रशासनाने 2012-13 व 2013-14 या दोन वर्षांत चारा छावण्या आणि चारा डेपो सुरू केलेल्या तालुक्यातील तहसीलदारांना पत्र पाठवून अनियमितता करणार्‍या संबंधित चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सरकारच्या गुन्हे दाखल करण्याच्या आदेशात काही तहसीलदारांना अडचणी आल्याने त्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शन मागवले होते. त्यानुसार आता जिल्हा प्रशासनाने सरसकट गुन्हे दाखल करण्याच्या सुचना तहसीलदार यांना दिल्या आहेत.

 

नगरसह अन्य जिल्ह्यात 2012-13 व 2013-14 अशा दोन वर्षे पडलेल्या दुष्काळात शेतकर्‍यांचे पशूधन वाचवण्यासाठी 1 हजार 273 ठिकाणी चारा छावणी आणि चारा डेपो सुरू करण्यात आले होते. यात नगर जिल्ह्यात 426, सोलापूरमध्ये 2012-13 मध्ये 193 आणि 2013-14 मध्ये 278, सांगली जिल्ह्यात 146, सातारा जिल्ह्यात 151 यासह बीड जिल्ह्यात काही ठिकाणी चारा डेपो आणि छावण्या सुरू केल्या होत्या. मात्र, या ठिकाणी अनियमितता झाल्याचे सरकारच्या लक्षात आले. त्यानुसार सरकारने संबंधित चालकांना दंड करत 7 कोटी 92 लाख रुपयांची नुकसान भरपाई वसूल केली होती.

 

दंडाची भरपाई केल्यानंतर नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एकनाथ पाटील ग्रामीण विकास संस्था व जय भवानी दुध उत्पादक संस्था या दोन छावणी चालकांवर गुन्हे दाखल करत फौजदारी स्वरूपाची कारवाई केली होती. त्यानुसार राज्यात ज्या ज्या जिल्ह्यात चारा छावणी आणि चारा डेपोत अनियमिता झालेली आहे. त्या सर्व ठिकाणी संबंधित चालक संस्थांवर पुन्हा फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेश सप्टेंबर 2017 ला सरकारचे उपसचिव सुभाष उमराणीकर यांनी काढले होते.

 

उमराणीकर यांच्या आदेशात अनियमिता केलेल्या छावणी चालक संस्था आणि त्यांच्या पदाधिकार्‍यांना काळ्या यादी टाकण्यात यावे, जिल्हाधिकारी यांनी अनियमितता प्रकरणी दंडात्मक कारवाई केली असली तरी संबंधित चारा छावणी चालक, चारा डेपो चालक यांच्या विरोधात नव्याने पोलीसांत गुन्हे दाखल करण्यात यावेत, तसेच वारंवार अनियमिता करणार्‍यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील संबंधित तहसिलदार यांना पत्र पाठवून गुन्हे दाखल करण्यास आदेश होते.

 

मात्र, कोणत्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे, वारंवार अनियमिता करणार्‍यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई आणि अनियमिता करणार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत हा आदेशाच अर्थ एकच असल्याने तहसीलदारांनी पुन्हा जिल्हाधिकार्‍यांकडून मार्गदर्शन मागवले होते. त्यानुसार आता जिल्हा प्रशासानाने अनियमिता करणार्‍यांवर सरसकट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

 

राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यांत चारा छावण्या आणि चारा डेपो चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश काढलेे होते. मात्र, महसूल विभागाच्या लाल फितीच्या कारभारात डिसेंबर महिना उजाडला तरी अद्याप नगर जिल्ह्यात गुन्हे दाखल झालेले नाहीत. राज्यात अन्य जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती सुत्रांना दिली. यामुळे नगरमध्ये दिरंगाई का असा सवाल आता उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

*