Type to search

Featured सार्वमत

छावणी चालकांची एकच हाक ‘कुणी टॅग देता का टॅग’

Share
पाथर्डी ( प्रतिनिधी) – राज्य शासनाने दुष्काळी तालुक्यात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या असून पाथर्डी तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक 107 छावण्या सुरू आहेत. छावण्यात गैरव्यवहार होऊ नये म्हणून सरकारने छावणी चालकांना सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात किचकट अटी घातल्या असून दर आठवड्याला नवीन अटी घातल्याने छावणी चालक पुरते वैतागले आहेत. दैनंदिन अवहाल देण्यासाठी प्रत्येक जनावरांसाठी बारकोड असलेले टॅग सक्तीचे केल्याने एकच धावपळ उडाली असून कुणी टॅग देता का टॅग अशी विचारणा छावणीचालक एकमेकांकडे करत आहेत.

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 4 मे रोजी बैठक झाली. त्यामध्ये छावण्यातील जनावरांच्या दैनिक उपस्थितीसाठी बारकोड असलेले टॅग जनावरांच्या कानात ठोकायचे व अ‍ॅड्राईड मोबाईल मध्ये शेतकर्‍यांची संपूर्ण माहिती भरायची. त्यानंतर दररोज प्रत्येक टॅग स्कॅन करून जनावरांच्या फोटोसह अहवाल पाठवायचा. तालुक्यात 107 छावण्यातील 65 हजार जनावरांना टॅग मारण्यासाठी 15 पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी त्यांनीच हे टॅग जनावरांच्या कानात मारायचे परंतु सदर टॅग कुठे मिळतात याची कल्पनाच छावणीचालकांना नसल्याने छावणी चालक तहसील कार्यालयाच्या आवारात एकमेकांना टॅग देता का टॅग असे विचारतांना दिसत आहेत.

हे टॅग मुंबई, दिल्ली, पुणे, नाशिक सांगोला येथील व्यवसायिकांकडून प्रति नग 8 ते 9 रुपये अधिक 18 टक्के जीएसटी रक्कम सबंधित व्यवसायीकाच्या खात्यावर आररटीजीएस करावी लागते. मात्र खात्यावर आरटीजीएस करताना तो बँक खाते क्रमांक कुणाची ओळख नाही पैसे कसे भरायचे, टॅग नक्की येतील का, फसवणूक तर होणार नाही ना? एवढ्या शंका असतांनाही त्या खात्यावर पैसे भरायचे. त्यानंतर टॅग त्या संस्थेच्या नावाने कुरियर ने येतात अशी चर्चा आहे. त्यासाठी टॅग विक्रेत्यांचे नंबर प्रत्येक छावणी चालकांकडे उपलब्ध आहेत; मात्र ते नंबर नेमके कुणाचे ते लागत नाहीत.

लागले तर उचलले जात नाहीत. अनेक टॅग विक्रेते नगरला या तेथे टॅग घेऊन येऊ असे सांगतात. छावणीचालक तीन चार वेळा नगरला गेले; मात्र टॅग काहीना मिळाले तर काहींना नाही. टॅग च्या नादात छावणी चालकांचे छावण्याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्याबाहेरून चारा, पाणी मिळविण्यासाठी दररोज मोठी धडपड करावी लागत असताना छावणी चालक मात्र टॅगच्या शोधार्थ दररोज पाथर्डी नगर वारी करताना दिसत आहेत. मात्र टॅग काही मिळत नाहीत. त्यामुळे छावणीचालक तहसील कार्यालयाच्या आवारात दररोजच एकमेकांना भेटल्यावर टॅग बुक केले का? टॅग मिळाले का? टॅग भेटतील का? टॅग देता का टॅग असे प्रश्न विचारताना पुरते वैतागलेले दिसत आहेत.

प्रशासन एकीकडे सरकारच्या नवीन नियम अटीची माहिती देण्यासाठी तसेच प्रशिक्षणासाठी छावणी चालकांची तहसिल कार्यालयात मिटींग बोलावते, दुसरीकडे छावणी तपासणीसाठी प्रशासनाचे पथक छावणीवर जाते, तिसरीकडे शासकीय लेखा परिक्षक ऑडिटसाठी दप्तरची मागणी करतात. चौथीकडे टॅग मिळविण्यासाठी प्रयत्न करायचे या सर्व धावपळीत जनावरांसाठी दैनंदिन चारा,पाणी, पशुखाद्य उपलब्ध करून वाटप करायचे अशी तारेवरची कसरत करतांना छावणीचालक मात्र पुरता कोलमडून गेलेला दिसत असुन यापुढील काळात छावणी नको रे बाबा असे बोलतांना दिसत आहेत.

बारकोड असलेले टॅग प्रशासनाने तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावेत. आम्ही रोख पैसे देऊन किंवा भरून टॅग खरेदी करू. त्यामुळे टॅग लवकर मिळतील व आमची फसवणूक होणार नाही अशी प्रतिक्रिया छावणी चालकाकडून होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!