Friday, May 3, 2024
Homeनाशिकतुरुंग अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

तुरुंग अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

सहा वर्षापूर्वी नाशिकरोड सेंट्रल जेलमधील ( Nashikroad Central Jail ) कैद्यास लाकडी पट्टी व प्लॅस्टिकच्या काचेने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात कारागृहाचे अधिकारी व कर्मचारी अशा सात जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी जीनल वेन्सील मिरांडा (कासार वडावली, ठाणे पश्चिम) यांनी दिलेल्या तक्रारीचा आशय असा की, त्यांचे पती वेन्सील रॉय मिरांडा हे मुंबई पोलिसांनी केलेल्या मोक्का व अन्य कारवाई अतंर्गत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. 14 डिसेंबर 2016 रोजी दुपारी कैदी वेन्सील वॉर्ड क्रमांक एकमध्ये आराम करत असताना तुरुंगाधिकारी खारतोडे यांनी वेन्सीलला सॅमसंग कंपनीचा मोबाईल देऊन तुला जेलमधून लवकर सुटका होण्यासाठी चांगला रिपोर्ट देईन, असे प्रलोभन दाखवून मोबाईल विकून टाक, असे सांगितले.

वेन्सीलने नकार दिल्याने खारतोडे यांनी त्याला गुन्ह्यात गुंतविण्यासाठी सदर मोबाईल फोडला. वेन्सीलने मोबाईलची बॅटरी स्वतःजवळ बाळगून नंतर ती कारागृहाच्या स्वच्छतागृहात टाकली, असे वॉकीटाकीवरून कळविले. नंतर तुरुंगाधिकारी आहिरे, मयेकर, बाबर, फड, खैरगे, शिपाई दातीर व इतरांनी वेन्सील याला कारागृहातील मनो-यावर नेऊन लाकडी पट्टी व प्लॅस्टिक काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केली. त्याला मारून टाकण्याची धमकी देण्यात आली. बॅरेकमध्ये असलेले कैदी हे संशयित अधिका-याच्या सांगण्यावरून कैदी वेन्सीलबरोबर वाद घालून गोंधळ घालतील आणि यावेळी तुरुंगाधिकारी अलार्म करून वेन्सील यास जीवे मारतील या उद्देशाने वेन्सीलला जनरल बॅरेकमध्ये ठेवण्यात आले.

वेन्सीलने न्यायालयात दाखल केलेल्या रिट पिटीशनबाबत दमदाटी करून खारतोंडे यांनी खोटा गुन्हा दाखल केला. तसेच अधिकारी खारतोंडे यांनी शिवीगाळ दमदाटी व जातीवाचक शिवीगाळ केली. कारागृहाच्या वैद्यकीय अधिका-यांनीही वेन्सीलला केलेल्या मारहाणीच्या दुखापतीबाबत उपचाराच्या कागदपत्रात खरी नोंद केली नाही. याबाबत वेन्सीलची पत्नी जीनल मिरांडाने नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात चौकशीसाठी अर्ज केला होता.

जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुध्द नाशिकरोड पोलिस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जबर मारहाण व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण प्रकरणातील आरोपी हे शासकीय सेवेत असल्याने तपासी अधिका-यांनी पोलिस आयुक्त आणि सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांकडे अभिप्रायासाठी कागदपत्र पाठवली. अभियोक्त्यांच्या अभिप्राय आणि न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण सात जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

या बाबत पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश नायदे उपनिरीक्षक मुंतोडे महिला पोलीस उपनिरीक्षक वाघ हे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या