Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

छावणी सुरू न झाल्याने शेतकर्‍याची आत्महत्या

Share
  • 10 तासांनंतर मृत शेतकर्‍याचे शवविच्छेदन
  • शेतकर्‍यांसह शिवसैनिक आक्रमक जिल्हा रुग्णालयात ठिय्या
  • जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस संरक्षण
  • रात्री उशिरा तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

अहमदनगर (प्रतिनिधी) – चारा छावण्या सुरू न झाल्याने नगर तालुक्यातील घोसपुरीत शेतकर्‍याने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. तेव्हा छावण्या सुरू न करणार्‍या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत, तोपर्यंत शवविच्छेदन करणार नाही आणि वेळ आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात अंत्यसंस्कार करण्याचा इशारा संतप्त झालेल्या आंदोलकांनी दिला आणि पोलीस प्रशासनाची एकच धावपळ उडाली.

यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिसांनी वेढा घातला. अखेर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार विजय औटी यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढल्यानंतर 10 तासांनी म्हणजेच सायंकाळी सहा वाजता मृत शेतकर्‍याचे शवविच्छेदन करण्यात आले.

वसंत सदाशिव झरेकर असे आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याचे नाव आहे. घोसपुरी, सारोळा आणि अकोळनेर येथील चारा छावण्या प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केली. नगर तालुक्यात पावसाचे प्रमाण जेमतेम असल्याने चार्‍याचा प्रश्न आहे. त्यामुळे छावण्या पुन्हा सुरू कराव्यात या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी शेतकर्‍यांनी पुणे रस्त्यावर केडगावात बायपास चौकात रास्तारोको आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने छावणी सुरू होणार नाही, असे सांगत पोलिसांना आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांची धरपकड करण्याचे आदेश दिले. या आंदोलनात वसंत झरेकर हेही सहभागी झाले होते.

पोलिसांनी धरपकड सुरू करताच त्यांनी अंगावरचा शर्ट फाडून टाकला. तसेच चारा छावण्या सुरू न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर शेतकर्‍यांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. मंत्री रामदास कदम, राधाकृष्ण विखे पाटील यांनी छावण्या सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. याही आंदोलनात झरेकर सहभागी होते. इतके करूनही घोसपुरीची चारा छावणी सुरू झाली नाही. अत्यल्प पावसामुळे चारा नाही. जनावरे कशी जगायची याची चिंता झरेकर यांना होती. त्याच चिंतेतून त्यांनी विषारी औषध सेवन करत आत्महत्या केली असा दावा शिवसैनिकांनी केला आहे.

झरेकर यांच्या आत्महत्येत प्रशासन जबाबदार असून चारा छावण्या सुरू न करणार्‍या अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई करावी अन्यथा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्याचा अथवा त्याचे शवविच्छेदन न करण्याचा इशारा संदेश कार्ले आणि बाळासाहेब हराळ यांनी दिला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. तहसीलदार, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कार्ले, हराळ यांनी केली. यासाठी मृतांच्या नातेवाईकांना तालुका पोलीस ठाण्यात धाडण्यात आले. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. यामुळे तणाव आणखी वाढला. मंत्री विखे आणि आ. औटी यांनी दोषींची चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर मृत शेतकर्‍यांचे शवविच्छदेन झाले. रात्री उशिरा तणावात घोसपुरी येथे झरेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
.
दोनशे छावण्या, लाख जनावरे
जिल्ह्यात 199 छावण्या सुरू असून त्यात 1 लाख 4 हजार 407 जनावरे असल्याचा खुलासा जिल्हा प्रशासनाने केला आहे. नगर तालुक्यात 27, जामखेड 19, पारनेर 34, कर्जत 57, पाथर्डी 31, श्रीगोंदा 6, शेवगाव 24, संगमेनर 1 छावण्या सुरू आहेत. यातील संगमनेरची छावणी 1 ऑगस्टला प्रशासनाने बंद केली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

झरेकर यांनी आत्महत्या करणार असे प्रशासनालाही बजावले होते. शुक्रवारी देखील त्यांनी छावण्या सुरू करा अन्यथा आत्महत्या करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळेच संदेश कार्ले यांनी घोसपुरी येथे जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांना समजावले, पण चिंतेने ग्रासलेले झरेकर यांनी आत्महत्या करत टोकाचे पाऊल उचलत सांगिल्याप्रमाणे करून दाखविले.

छावणीत त्यांची जनावरे नाहीच प्रशासनाचा खुलासा
चारा छावणी सुरू न केल्याने वसंत झरेकर यांनी आत्महत्या केल्याची अफवा असून वस्तुस्थितीचा विपर्यास केल्याचा खुलासा जिल्हा प्रशासनाने केला आहे. घोसपुरी येथील चारा छावणी आजही सुरू असून पावणेसहाशे जनावरे तेथे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ऐन उन्हाळ्यात घोसपुरी येथे चारा छावणी सुरू असतानाही झरेकर यांचे एकही जनावर छावणीत नव्हते. छावणी बंद झाल्यानंतर अन् सुरू होतानाही झरेकर यांचे जनावरे छावणीत नव्हती. आजमितीला घोसपुरीची छावणी सुरू असून तेथे 48 लहान तर 525 मोठी जनावरे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. झरेकर यांच्या आत्महत्येचा गैरप्रचार सुरू आहे. जिल्ह्यातील वातावरण दुषित न करता वस्तुस्थिती तपासून पहावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!