श्रीरामपुरातील ‘जॉगिंग’ पार्कचा बदलला ट्रॅक

0

व्यथा श्रीरामपूरची अपेक्षा जनतेची : राजेंद्र बोरसे, श्रीरामपूर

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून सकाळ संध्याकाळी भर रस्त्यावरून फिरणार्‍या नागरिकांसाठी काही ठराविक जागेत फिरता यावे म्हणून चार ते पाच ठिकाणी तयार करण्यात आलेल्या जॉगिंग ट्रकची अवस्था दयनीय झाली आहे. नागरिकांचे आरोग्य अबाधित व चांगले रहावे म्हणून पालिकेने हे जॉगिंग ट्रॅक जिवंत ठेवावे व त्याची निगा राखली जावी अशी श्रीरामपूरच्या जनतेची अपेक्षा आहे.
काही वर्षांपूर्वी सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी येथील नागरिक मुख्य रस्त्यांचा वापर करत असत. परंतु या रस्त्यांवरुन भरधाव जाणारी वाहने त्यामुळे जीव मुठीत ठेवून सकाळची फेरी करावी लागत असे, या भरधाव वाहनांच्या येण्याजाण्यामुळे जीवाची भीती, त्या गाड्यांच्या धुरांचे प्रदूषण यामुळे आरोग्य सुधारण्याऐवजी त्याचे इतर परिणाम होणे या सर्वातून सुटका व्हावी म्हणून ससाणे यांच्या प्रयत्नातून नगरपालिकेने प्रवरा डाव्या कॅनालच्या जागेचा वापर करून त्या ठिकाणी सरस्वती कॉलनी ते नॉदर्न ब्रँच पर्यंत तीन टप्प्यांत जॉगिंग ट्रक तयार करण्यात आले.
त्यात एक मातीचा, एक सिंमेट क्राक्रिटचा आणि एक़ साधा असे ट्रॅक तयार करुन लोकांची फिरण्याची एकाच ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर वॉर्ड नं. 1 व थत्ते मैदानावरही असे ट्रॅक तयार करण्यात आले. या जॉगिंग ट्रॅकवर लोकांना व्यायाम करता यावा म्हणून व्यायामाचे साहित्यही बसविण्यात आले. काही नगरसेवकांच्या मदतीने व अन्य दानशूर लोकांच्या मदतीने हे व्यायामाचे साहित्य घेण्यात आले होते.
तसेच या ट्रॅकवर दोन्ही बाजूंना झाडे लावण्यात आली होती. फिरता फिरता संगीताचा आनंद घेता यावा म्हणून सुंदर अशी भक्तीमय व जुन्या गीतांची गाणी या ठिकाणी दररोज सकाळ संध्याकाळी लावण्यात येत होती. त्यामुळे नागरिक अत्यंत आनंदात सकाळ व संध्याकाळी फिरण्याचा आनंद घेत व्यायाम करत होते; परंतु गेल्या एक ते दीड वर्षापासून या जॉगिंग ट्रॅकची अवस्था दयनीय अशी झाली आहे. दोन्ही बाजूंनी जी झाडे लावली होती ती अस्ताव्यस्त वाढली आहेत. आतल्या बाजूने फिरणार्‍या लोकांना त्रास होत आहे.
तर बाहेरच्या बाजूने कॅनालच्या बाजुने असलेल्या रोडवरुन जाणार्‍या वाहनांना त्याचा त्रास होत आहे. काहीवेळा अपघातही संभवतात. तसे अपघातही झालेही आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून या झाडांची कटींगही झालेली नाही. व्यायामासाठी जे साहित्य ठिकठिकाणी उभारण्यात आलेले आहेत त्या अनेक साहित्याची चोरी झालेली आहे, तर अन्य साहित्याची तोडफोड झालेली आहे.
तीनही ट्रॅकवरील ही दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. जे मातीचे ट्रॅक आहेत, तेथील मातीही बदलण्यात आलेली नाही. ठिकठिकाणी दगडे व खड्डेही पडले आहेत. यातील काही जॉगिंग ट्रॅकचा वापर प्रेम करणार्‍या अनेक जोडप्यांचे बसण्याचे ठिकाण झालेले आहे. तासनतास या ठिकाणी लोकांना लाजवेल अशा पध्दतीने बसत असतात. त्यामुळे काही लोक या ठिकाणी फिरण्यास धजावत नाहीत.
सरस्वती कॉलनीत माजी नगरसेवक आशिष धनवटे यांनी स्वतः तसेच इतरांच्या मदतीने त्या ठिकाणी सुसज्ज असे लहान मुलांसाठी बगीचे तसेच त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे तयार करण्यात आलेले प्राणी हे आकर्षण होते. येथे लावलेली सुंदर झाडे इतर प्राण्यांनी खाऊ नयेत म्हणून जाळी बसविण्यात आली होती. तसेच रात्रीच्यावेळी या ठिकाणी लाइटींगची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे लोकांच्या आवडते ठिकाण झाले होते; परंतु या जाळ्या कपडे वाळवण्याचे ठिकाण झाले. या ठिकाणी शेळ्याही बांधल्या जातात, यातील झाडे अस्ताव्यस्त वाढली गेली अनेक साहित्यांची तोडफोड झाली आहे.
तरी शहरातील या जॉगिंग ट्रॅकची दुरुस्ती करण्यात येऊन झाडांची कटिंग करण्यात यावी व व्यायामाच्या ज्या साहित्याची चोरी झाली आहे, तोडफोड झाली आहे ती दुरुस्त करण्यात यावी व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे जॉगिंग ट्रॅक पूर्ववत सुरू करुन नागरिकांचे आरोग्य चांगले राहील यासाठी पालिकेच्या सत्ताधार्‍यांनी सुधारणा करावी अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

*