सोशल मीडिया वापरून चांदवडकर तरुणांची केरळसाठी मदत

पुरग्रस्तांसाठी मदत उभारून समाजापुढे ठेवला नवा आदर्श

0

चांदवड (वार्ताहर) ता. ३ : समाजाला चांगुलपणाचे दान द्यावे या उदात्त भावनेतून चांदवड तालुक्यातील तरुण केरळ राज्यातील पुरग्रस्तांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. त्यामुळे सध्या या तरुणांची तालुक्यातच नव्हे, तर केरळ राज्यातही चर्चा आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याची कल्पना देशदूतचे वार्ताहर हर्षल गांगुर्डे यांनी मित्रांसमोर मांडताच सोशल मीडियाचा वापर करत फक्त 48 तासात या तरुणांनी १ ट्रक भर जीवनाआवश्यक वस्तू जमा केल्या. या कामात सर्व चांदवडकर मंडळी, शाळा, कॉलेज यांच्यासह शिक्षकही सहभागी झाले.

ही सर्व मदत चांदवडचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष रेल्वे डब्याने केरळकडे पाठविण्यात आली.  सोबत पंधरा तरुणांचा चमूही होता.

तब्बल ३२ तासांचा प्रवास करून या चांदवडकर तरुणांनी केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी के. मोहम्मद यांच्या मदतीने सर्व मदत केरळ च्या ग्रामीण भागात पोहचवलीच. याशिवाय येथील मदत केंद्रात सलग १२ तास श्रमदान केले.

या चमूमध्ये चांदवडचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्यासह डॉक्टर नवलकिशोर शिंदे,  राहुल केदारे,  अंबादास केदारे, विकी गवळी,  वैनतेय आहेर, रवींद्र ठोबरे, नितीन ठाकरे, रोहन कापडणे, सागर गांगुर्डे,  सचिन निकम, दीपक जगताप, शुभम खैरे यांच्यासह हर्षल गांगुर्डे यांचा सहभाग होता.

दोन दिवस केरळ राज्यातील खेड्यातील वस्त्यांवर पोहचत या टीमने चांदवडकरांचा मदतीचा हात गरजूंच्या हातात दिला. या सर्व प्रक्रियेत चांदवड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील, पो. उपनिरीक्षक कैलास चौधरी यांच्यासह संपूर्ण कर्मचाऱ्यांनी मोठी मदत उभारून देत मोठे सहकार्य केले.

एकूणच तरुणाबाबतच्या सर्व नकारात्मक गोष्टींना शह देत या तरुणांनी सोशल मीडिया चा ‘काबिल ये तारीफ” वापर करून चांदवड ते केरळ केलेला प्रवास इतर तरुणांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

एर्नाकुलमच्या जिल्हाधिकाऱ्याकडून चांदवडकरांची प्रशंसा

चांदवडकरांनी केलेली मोठी मदत आणि तरुणांनी केलेले मोठे श्रमदान बघता “ही मदत केरळवासींसाठी खूप आधार देणारी ठरेल”  अशा शब्दात केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी के. मोहम्मद यांनी सर्व चांदवकरांचे आभार मानत तसे पत्र टिमकडे सुपूर्त केले.

वैभव अहिरे यांनी सांभाळली दुभाषिक म्हणून जबाबदारी

केरळ राज्यात मल्याळम आणि इंग्रजी भाषा प्रामुख्याने बोलली जाते अशावेळी मराठी तरुणांना संवाद साधण्यासाठी अडचणी येत होत्या. ती गरज वैभव अहिरे यांनी भरून काढल्याने या टीम ला मोठी मदत झाली.

LEAVE A REPLY

*