Type to search

ब्लॉग

Blog : चंद्रास कवेत घेताना…!

Share

चांद्रयान-2 चे यशस्वी उड्डाण हे भारतीय आंतराळ विज्ञानाचे यश आहे…हे बोल आहेत इस्त्रोचे प्रमुख के.सीवन यांचे. त्यांच्या मताशी आज भारताचा प्रत्येक विज्ञानवादी नागरिक सहमत आहे. सोमवारी दुपारी 2 वाजून 43 मिनीटांनी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रावरून यानाचे यशस्वी प्रक्षेपण झाले. ही मोहिम म्हणजे भारताची आंतराळ संशोधनातील भीमउडी आहे, असेे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याचे कारण आहे संपूर्ण मोहिम देशी बनावटीची असणे. विशेष म्हणजे भारताने माफक खर्चाच्या चंद्र मोहिमेची यशस्वी सुरूवात करून जागतिक संशोधनासाठी नवी कवाडेही उघडली आहेत.

भारतीय मोहिमेचा खर्च आहे अवघा 978 कोटी रूपये. नासा चंद्र मोहिमांवर खर्च करते त्यापेक्षा अनेकपटींनी कमी. 12 नोव्हेंबर 2007 मध्ये चांद्रयान-2 चा संकल्प सोडला गेला. त्यावेळी रशियन फेडरल स्पेश एजन्सी आणि इस्त्रो यांचा संयुक्त उपक्रम, अशी ही मोहिम होती. 18 सप्टेबर 2008 मध्ये या मोहिमेला केंद्र सरकारने मंजूरी दिली. 2009 मध्ये या मोहिमेचा आराखडाही निश्‍चित झाला. ऑर्बीटर आणि रोव्हरची जबाबदारी इस्त्रोकडे तर लॅण्डर निर्मितीची जबाबदारी रशियन आंतराळ संस्थेकडे अशी विभागणीही निश्‍चित झाली. रशियाकडून लॅण्डरची निर्मिती लांबल्याने जानेवारी 2013 मध्ये मोहिम स्थगित झाली. 2016 चा नवा मुहूर्त निश्‍चित करण्यात आला. मात्र रशियाचे मंगळ अभियान अपयशी ठरले आणि भारताची चंद्र मोहिम अडचणीत आली. रशियाने सर्व लक्ष मंगळ मोहिमेवर लक्ष केंद्रीत केल्याने चंद्रयान-2 या मोहिमेतून रशियाने अंग काढून घेतले. भारतीय शास्त्रज्ञांसाठी हीच इष्टापत्ती ठरली. भारताने मोहिम स्वबळावर यशस्वी करण्याचे ठरविले.

तांत्रिक तयारी, चाचण्या अशा बाबी अत्यंत काटेकोर हाताळण्यात आल्या. 2018 पासून अनेक निर्धारित वेळा टळल्या. संशोधक कोणताही धोका पत्करण्यास तयार नव्हते. 14 जुलै 2019 चांद्रयान-2च्या प्रक्षेपणाची तारीख निश्‍चित झाली. मात्र तांत्रिक अडचणींमुळे हा मुहूर्तही टळला. शेवटी 22 जुलै 2019 रोजी भारताच्या आंतराळ संशोधनातील ऐतिहासिक क्षण आला. संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या चंद्र मोहिमेच्या स्वप्नाला घेवून जेएसएलव्ही एमके3 एम 1 हे प्रक्षेपण यान आंतराळात झेपावले आणि एका नव्या अध्यायाला प्रारंभ झाला. 48 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयानाचे लॅण्डर चंद्रावर उतरेल, तो क्षण भारतीयांसाठी अभिमानाचा असेल!

विशेष म्हणजे भारताचे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. आजवर अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्र मोहिमा राबविल्या, त्यापैकी एकानेही दक्षिण ध्रुव गाठलेले नाही. दक्षिण ध्रुवावर उतरणारे भारताचे यान पहिलेच असेल. एकप्रकारे दादा देशांवर भारताने केलेली ही कडी आहे. भारताच्या पहिल्या चंद्र मोहिमेत दक्षिण ध्रुवावर पाणी असल्याचे संकेत मिळाले होते, त्यामुळे भारताचे तेथे जाणे संशोधनाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे. सातत्याने प्रकाशापासून अलिप्त असलेल्या चंद्राच्या या दक्षिण ध्रुवावर काय दडले आहे, याचा शोध भारतीय संशोधक घेतील. भारताच्या या चंद्र मोहिमेतून पुढील 500 वर्षाच्या उर्जा गरजांची पूर्ती करण्याचे संशोधकांचे स्वप्न आहे. त्यांच्या यशासाठी आपण कामना करूया!

– प्रतिनिधी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!