चंद्रशेखर घुले हेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष

0

जिल्हा प्रभारी दिलीप वळसे यांचे पत्रक

अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांना बदलण्यात येणार असल्याची माहिती पसरवण्यात येत आहे. सोशल मीडियावर येणारी माहिती ही निराधार असून त्यात काहीही तथ्यता नाही.

हा प्रकार म्हणजे खोडसाळपणा असून पक्ष आणि संघटना खिळखीळ करण्यासाठी आहे. जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या कोणत्याच हालचाली प्रदेश पातळीवरून नाहीत. चंद्रशेखर घुले हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. निरर्थक माहितीवर विश्वास ठेवू नये, असा खुलासा जिल्हा प्रभारी दिलीप वळसे यांनी स्पष्ट केले.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात वळसे यांनी स्पष्ट केले की, शरद पवार यांनी पक्षाच्या अडचणीच्या काळात नगर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी घुले यांच्या हाती सोपवली. घुले यांनीही दिलेली जबाबदारी सामर्थ्यपणे सांभाळली असून याची प्रचीतीच जिल्ह्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पक्षाला मिळविलेले यश आहे.

जिल्ह्यात झालेल्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यात घुले यांचा मोलाचा वाटा आहे. कोपरगाव, शेवगाव, राहुरी आणि पारनेरमध्ये उपसभापती, तर अकोले, शेवगाव, राहुरी, जामखेड, श्रीरामपूर या नगरपालिकामध्ये घवघवीत यश पक्षाला मिळालेले आहे. राष्ट्रवादी पक्ष सत्तेत नसतांनाही घुले यांनी जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये यश संपादन केलेले आहे.
जिल्हाध्यक्ष घुले यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत व बळकट केलेली आहे. संघटनेतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सोबत घेऊन व त्यांचा विश्वास संपादन करूनच हे यश मिळविले आहे. साखर कारखान्यांसह शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात संघटनात्मक बांधणी उत्कृष्ट केलेली आहे.

त्याचे फलित नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मिळविले यश आहे. पक्षाच्या वर्धापनदिनामध्ये घुले यांनी जिल्ह्यात वेगळाच उपक्रम राबविला. यामध्ये शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी तालुकानिहाय शेतकर्‍यांच्या एक लाखाहून अधिक सह्यांची मोहीम राबवून स्थानिक तालुकानिहाय तहसिलदार व जिल्ह्याच्या ठिकाणी निवासी जिल्हाधिकारी यांना त्या सह्यांचे निवेदन देत पक्षाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.
घुले यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नसून व ते राजीनामा देणारही नाहीत. जिल्हाध्यक्ष बदलाबाबत प्रदेश पातळीवर हालचाली अशा निराधार माहिती सोशल मिडियावर पसरवण्यात येत आहे. काही विरोधक जाणीवपूर्वक अशी माहिती पेरून पक्ष संघटनेच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वळसे यांनी स्पष्ट केले आहे.

 

LEAVE A REPLY

*