Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील

Share

पुणे (प्रतिनिधी)- राधाकृष्ण विखे पाटील भाजपात आल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकांसाठी संगमनेर विधानसभा मतदार संघात आणि नगर जिल्ह्यात मला लक्ष देण्याची गरज नाही. विखे त्यासाठी समर्थ आहेत अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

चंद्रकांतदादा पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष म्हणून आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड केली आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी जसे बारामतीवर आपण स्वत: लक्ष केंद्रित केले होते. त्याप्रमाणे संगमनेर विधासभा मतदारसंघावर करणार का ? असे विचारले असता, पुणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी मी बारामतीवरलक्ष केंद्रित केले होते. राधाकृष्ण विखे हे स्वत: भाजपात आलेले आहेत. तसेच दोन खासदार युतीचे नगर जिल्ह्यात आहेत. त्यामुळे संगमनेर अथवा नगर जिल्ह्यात माझी गरज लागणार नाही. विखे त्यासाठी समर्थ आहे असे पाटील यांनी नमूद केले.

विखेंवर कुठलेही आरोप नाहीत
दुसर्‍या पक्षातून आलेल्यांना संधी दिली जाते. पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होत नाही का? असे विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, 122 पैकी 18 आमदार हे आयत्यावेळेला मागच्या विधानसभेच्या वेळी भाजपामध्ये आले. 104 हे भाजपचे आहेत. त्याची टक्केवारी किती होते ते बघा. सर्व आमदार भाजपाचे आहेत. मंत्रिमंडळामध्ये एक विखे यांना मंत्रिमंडळात घेतले. बाकीचे सर्व पक्षाचे मंत्री आहेत. ज्यांना पक्षात घेतो त्यांना ताऊन सुलाखून घेतो. विखे काँग्रेसवाले होते. परंतु त्यांच्यावर एकही आरोप नाही. आम्ही भुजबळांना भाजपात घेतले का? असे सांगत आम्ही पक्षात घेताना पक्षाच्या ‘कल्चर’शी सुट अशाच लोकांना घेतो. ‘आओ जाओ, घर तुम्हारा’ असे करत नाही. चुकून एखाद्या स्थानिक ठिकाणी कोणी कोणाला प्रवेश दिला. तर तेथील पक्षाच्या अध्यक्षाला नोटीस पाठवून ज्याला पक्षात घेतले त्याची सुटी करून टाका असे सांगितले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री पदावरून भाजपा आणि शिवसेनकडून रोज होत असलेल्या दाव्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, राजकारणामध्ये महत्वाकांक्षा महत्वाची असते. ती नसेल तर मग एखादी संस्था, ट्रस्ट काढून काम केले जाते. त्यामुळे राजकारणात स्वप्न पाहिले आणि ते व्यक्त केले तर चुकीचे नाही. मुख्यमंत्रीपदाबद्दल वास्तवात काय होईल हे ठरलेले आहे आणि मुख्यमंत्र्यांनी काल ते स्पष्टही केले आहे असे ते म्हणाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत उद्धवजी आणि देवेन्द्रजी यांची याबाबत जी बैठक झाली, त्यामध्ये हे सर्व ठरलेले आहे. प्रत्येकाला आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी एक धोरण म्हणून असं म्हणतच राहावे लागते असेही ते म्हणाले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!