Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

चांदोरी, सायखेडा अद्याप पाण्यात

Share

निफाड । प्रतिनिधी

गोदावरी, दारणा, कादवा नद्या अद्यापही धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून रविवारच्या तुलनेत पुराचे पाणी कमी झाले असले तरी ही प्रक्रिया कासव गतीने होत असल्याने अद्यापही सायखेडा, चांदोरीसह इतर गावे पुराच्या पाण्याखाली असून चांदोरी जवळ महामार्गावर पाणीच पाणी असून सायखेडा, करंजगाव, नांदूरमध्यमेश्वर हे पुल पुराच्या पाण्याखाली असल्याने हे सर्व मार्ग खंडीत झाले आहे. पुरामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबियांसाठी मदतीचा ओघ सुरु असला तरी आता त्यांना कायमस्वरुपी निवार्‍यासह त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे बनले आहे. सोमवारी सायंकाळी नांदूरमध्यमेश्वर धरणातून 1 लाख 32 हजार क्युसेक चा विसर्ग सुरु होता. तर नाशिक-औरंगाबाद महामार्ग ठप्प असल्याने नाशिककडे जाणारी वाहने निफाडच्या शांतीनगर चौफुलीजवळील रस्त्याच्या कडेला उभी होती.

गेल्या आठ दिवसांपासून संपुर्ण जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्याने इगतपुरी, दिंडोरी तालुक्यातील धरणे भरली असून खबरदारीचा उपाय म्हणुन या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. तर पावसाच्या वाहणार्‍या पाण्यामुळे त्यात आणखी भर पडून गोदावरी, दारणा, कादवा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अवघा गोदाकाठ जलमय झाला आहे. काल सोमवार दि.5 रोजी दुसर्‍या दिवशी देखील सायखेडा, चांदोरी गावे पुराखाली असून निफाड-नाशिक महामार्गावरील वाहतुक दोन दिवसांपासून ठप्प आहे. तर शिंगवे, कोठुरे, शिंपीटाकळी या गावातील अनेक घरे पुराच्या पाण्याखाली आहेत. पुरात अडकलेल्या नागरीकांना काढुन सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी गावातील तरुण तसेच एन.डी.आर.एफ चे जवान प्रयत्न करीत आहे. सायखेडा शहर व परिसरात अडकलेल्या सुमारे 63 नागरीकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान सायखेडा, चांदोरीमध्ये प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जात असून प्रशासनातील महसूल अधिकारी, कर्मचारी तसेच पं.स. कर्मचारी, अधिकारी, पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी सायखेडा, चांदोरीत तळ ठोकून आहेत.

बाजारपेठ पाण्यात, जनजीवन विस्कळीत

चांदोरी, सायखेडा बाजारपेठा पाण्यात असून गोदाकाठचे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे आता गोदाकाठच्या नागरीकांची मोठी आर्थिक हानी झाली असून पुराच्या पाण्यात अनेकांचे संसार वाहून गेले तर अनेकांची घरे जमिनदोस्त झाली. दुकाने पुराच्या पाण्यात वाहून गेली असून सारी कुटुंबे आता उघड्यावर येणार आहेत.

शिंगवे पुरात अडकलेले बाहेर

शिंगवे येथे मारुती मंदिराच्या उत्तरेकडे शेतात राहणारे वसंत सानप यांचे बंगल्याचे काम चालु असल्याने ते कुटुंबासह या बंगल्यातच राहत होते. मात्र रविवारी सकाळी पुराच्या पाण्याने त्यांच्या बंगल्याला वेढा दिल्यानंतर हे कुटुंब वरच्या मजल्यावर गेले. मात्र पुराचे पाणी वाढत असल्याने वसंत शिंदे हे पत्नी सुनंदा सह त्यांचे बंगल्याच्या वरच्या माळ्यावर तर घरातील बाकीचे शेजारील गोपाळा रायते यांचे बंगल्यात हलविण्यात आले.

मात्र हे दोन्ही बंगले पुराच्या पाण्यात वेढल्याने अखेर सोमवारी सकाळी वसंत सानप, पत्नी सुनंदा सानप यांना दोर व बाजेच्या सहाय्याने तरुणांनी बाहेर काढले तर या शेजारीच असलेल्या गोपाळा रायते यांचे बंगल्यात गोपाळा रायते यांचेसह वसंत सानप यांचे कुटुंब याच बंगल्यात हलविण्यात आले होते. त्यामुळे वसंत सानप यांची मुलगी पल्लवी बोडके सुन मंगल सानप, सुन चित्रा सानप, नात राधवी, नातू यश बोडके, आई अंजनाबाई सानप यांना गावातील पट्टीचे पोहणारे पिंटू खराटे, गोरख गांगुर्डे, शिवाजी गायकवाड, शंकर गवारे व त्यांचे टिमने काल दुपारी 1 वाजता सुखरुप बाहेर काढले.

रुग्ण व नातेवाईकांचे हाल

पुरामुळे नाशिक-औरंगाबाद महामार्ग बंद असल्याने नाशिकहून गावाकडे तर गावाकडून रुग्णांना नाशिकला नेण्यासाठी नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागली. त्यातच बससेवा दोन दिवसांपासून बंद असल्याने खाजगी प्रवाशी वाहनांद्वारे नागरीकांना पिंपळगाव, ओझर मार्गे लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागला. यात वेळेबरोबरच पैसा देखील खर्च झाला.

बाजारपेठामध्ये शुकशुकाट

गेल्या आठ दिवसांपासून बरसणार्‍या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होवून त्याचा थेट परिणाम तालुक्यातील बाजारपेठावर झाला आहे. पावसाअभावी नागरीक घराबाहेर पडत नसल्याने बाजारपेठेतील आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात मंदावली असून त्यातच शाळा, महाविद्यालयांना असणार्‍या सुट्टीमुळे गावामध्ये देखील शुकशुकाट दिसून आला. तर गोदाकाठच्या नागरीकांनी मात्र पूर पाहण्यास पसंती दिली. गेल्या आठ दिवसांपासून सुर्याचे दर्शन झाले नसल्याने व सर्वत्र ढगाळ व दलदलीचे वातावरण असल्याने आता तरी सुर्यनारायणाचे दर्शन व्हावे अशी अपेक्षा वयोवृद्ध नागरीक करतांना दिसत होते.

परिसरातून मदतीचा ओघ

चांदोरी येथील पुरामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबियांना चांदोरीच्या गोदावरी मंगल कार्यालय, श्रीराम जानकी मंगल कार्यालय व कृष्ण मंदिर या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असून अनेक गावातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यात पाण्याच्या बाटल्या, मसाले भात, शिरा, बिस्कीटे आदी पदार्थ पाठविण्यात येत आहे. तर सायखेडा येथील विस्थापित कुटुंबांची जि.प. शाळा, सायखेडा विद्यालयात व्यवस्था करण्यात आली असून प्रशासनामार्फत त्यांना सुविधा व अन्न पाण्याची सोय करण्यात आली असून तालुक्यातील स्वयंसेवी संस्थांकडून व विविध गावातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.

स्नानासाठी गर्दी

महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या नांदूरमध्यमेश्वर येथे गोदावरी, दारणा, कादवा या नद्या दक्षिण वाहिनी झाल्याने या दक्षिण वाहिनीच्या काठावर स्नान केल्यास पुण्य मिळते अशी अख्यायिका आहे. तर येथीलच मृगव्याधेश्वर जवळील काशी विश्वनाथ पाराला पाणी लागल्यानंतर काशीपेक्षा जास्त पुण्य लाभते असे भाविक सांगतात. 1972 नंतर प्रथमच काशी विश्वेश्व पार पुर्णपणे पाण्यात बुडाला तर मृगव्याधेश्वर मंदिर अर्धे बुडाले.

त्यामुळे या ठिकाणी परिसरातील महिला वर्गांनी हजेरी लावत स्थान करुन परिसरातील मंदिरांचे पूजन केले. सोमवारी दिवसभर या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होती. येथीलच स्मशानभूमी प्रथमच पाण्यात पुर्णपणे बुडून जावून पुराचे पाणी लासलगाव-सिन्नर महामार्गावरील नांदूरमध्यमेश्वर येथे या रस्त्याला लागल्याने पुर पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच घोटी, सिन्नर, निफाड, वणी, वघई, सुरत या राज्य क्रं. 23 वरील नांदूरमध्यमेश्वर येथील गोदावरी नदीवरील पुल पुर्णपणे बुडाल्याने या मार्गावरील वाहतुक गेल्या दोन दिवसांपासून ठप्प झाली आहे. पुराच्या पाण्यात मृत जनावरे, व्यावसायिकांच्या टपर्‍या, भांडी, झाडे आदींसह नानाविध वस्तू वाहत येत असल्याचे दिसून येत आहे. तर पुराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात सर्प देखील आपला जीव वाचवितांना दिसून आले. काल दुपारनंतर पावसाने उघडीप दिल्याने आता तरी सुर्यनारायणाचे दर्शन व्हावे व पावसाने काही दिवस विश्रांती घ्यावी अशी अपेक्षा बळीराजासह सर्वसामान्य नागरीक करतांना दिसत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!