Friday, May 3, 2024
Homeजळगावजिल्हाधिकार्‍यांपुढे आता गर्दी रोखण्याचे आव्हान

जिल्हाधिकार्‍यांपुढे आता गर्दी रोखण्याचे आव्हान

अमोल कासार :

करोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दिवसरात्र अनेक उपाय योजना करण्यात आल्यात. त्यामुळे कोरोनाला अटकाव घालण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले.

- Advertisement -

जिल्ह्यात लावण्यात आलेले कडक निर्बंध शिथील झाल्याने बाजापेठांमध्ये तुडूंब गर्दी होवू लागली आहे. यामुळे जिल्ह्यात तिसर्‍या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. दुसर्‍या लाटपेक्षा तिसरी लाट भयंकर असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला अटकाव घातला त्याप्रमाणे आता त्यांच्यांपुढे गर्दीला अटकाव घालण्याचे आव्हान ठाकले आहे.

करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर लग्नसमारंभ, राजकीय मेळावे, यासह ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनी कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात केेला ही वास्तवता नाकारता येणार नाही. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले होते.

जिल्ह्यात दररोज हजाराच्या पटीत रुग्ण वाढत असल्याने रुग्णांना बेड मिळणे देखील कठीण झाले होते. अशी परिस्थिती असतांना शासनाने राज्यासह जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्याचे संपुर्ण अधिकार जिल्हाधिकार्‍यांना सोपविले होते.

अशा परिस्थितीत एकीकडे जिल्हाधिकार्‍यांना निर्बंधांबाबत उपायोजना करणे तर दुसरीकडे वाढती रुग्ण संख्येसह बेडची उपलब्धता, रेमडेसिविरवर नियंत्रण ठेवण्याचे भले मोठे आव्हान त्यांच्या समोर होते. अशा बिकट परिस्थितीत जिल्हाधिकार्‍यांनी प्रशासकीय पातळीवर बेड नियंत्रण कक्षाची तयार करीत बेड व्यवस्थापनामुळे रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होण्यास निश्चितपणे मदत झाली. त्यानंतर रेमडेसिविरचा तुटवडा असतांना त्याचा काळाबाजार होवू नये म्हणून रेमडेसिवीर वाटपाची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हातात घेत गरजू रुग्णांना तात्काळ उपलब्ध करुन देत त्यांना जीवदान देखील दिले.

शासनाने घालून दिलेल्या नियमात जळगाव जिल्ह्याचा पहिल्या टप्प्यात समावेश असल्याने जिल्ह्यात अनलॉक करण्यात आले आहे. परिणामी बाजारपेठेत पुन्हा गर्दी उसळू लागली आहे. स्थानिक प्रशासनाकडून गर्दी होणार्‍या ठिकाणांवर नजर ठेवली जात आहे. मात्र कोरोनाला अटकाव घालण्यासाठी इतकेच पुरेसे नसून तिसर्‍या लाटेला वेशीवरच अटकासाठी जिल्हाधिकार्‍यांना कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. तरच तिसर्‍या लाटेला अटकाव करणे शक्य होईल !

- Advertisment -

ताज्या बातम्या