महिला सक्षमीकरणातून भारत बलशाली होईल

0
‘सार्वमत कर्मयोगिनी’च्या निमित्ताने चैतालीताई काळे यांच्याशी संवाद
जगभर स्त्री पुरुष उत्पन्नातील तफावत सरासरी 24 टक्के असून अग्नेय आशियायी देशांमध्ये ही तफावत 33 टक्के आहे. अधिकार पदावर काम करणार्‍या महिलांचे प्रमाण अवघे 33 टक्के आहे. जगभरात 53 कोटी घरगुती काम करणार्‍यांमध्ये 83 टक्के प्रमाण महिलांचे आहे. आपल्या देशात महिलांना संघर्ष करावा लागतो. नव्या बदलांसाठी जग पुढे सरसावले आहे. महिला सक्षमीकरणाच्या प्रत्येक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास भारत देश जगात बलशाली होईल यात शंका नाही. भारतातील महिलांची स्थिती, सामाजिक सहभाग, कायदे व सामाजिक परिस्थिती चिंताजनक आहे. महिलाही सर्वच ठिकाणी उत्तम काम करत आहे. महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने प्रभावी उपाय योजना व निर्णय घेणे ही काळाची गरज बनली आहे असे मत अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई आशुतोष काळे यांनी नोंदविले.

आज नगर येथील माउली सभागृहात ‘सार्वमत कर्मयोगिनी पुरस्कार’ प्रदान सोहळा अभिनेत्री पूनम शेंडे यांच्या विशेष उपस्थितीत रंगणार आहे. कर्मयोगिनी उपक्रम आणि महिलांचे विश्‍व या अनुषंगाने सौ. चैतालीताई बोलत होत्या. ‘सार्वमत’च्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांनी महिला विश्‍वविषयी भूमिका मांडली. आव्हाने या अनुषंगाने विवेचन मांडले. महिलांच्या बाबतीत पूर्व इतिहासाबाबत सौ. काळेे यांना विचारले असता त्या म्हणाल्य, सभोवताली समाजाकडे स्त्री म्हणून सखोल दृष्टीने बघते त्यावेळी अशी जाणीव झाली. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जग झपाट्याने पुढे चालले आहे. त्यामानाने स्त्रीच्या स्थितीची गती मात्र आजही जैसे थेच आहे. पतीचे प्राण यमाकडून परत मिळविणार्‍या सावित्रीमध्ये एवढे सामर्थ्य असताना आजच्या महिलांना परिस्थितीशी सातत्याने शरण का जावे लागते? धडाडी, चिकाटी, सामर्थ्यांच्या जोरावर स्वत्व सिद्ध करणार्‍या महिलांनाही झगडावे लागते यावर चिंतन करण्याची गरज आहे. भारतीय संस्कृती महान आहे.

या संस्कृतीच्या जोरावरच महिला सर्वच क्षेत्रांत प्रगतीची शिखरे सर करीत आहेत. मात्र समाजात आजही स्त्रीला दुय्यम स्थान आहे. मनात दृढ इच्छाशक्ती असेल तर महिलांसाठी कोणतेही आव्हान अवघड नाही. हाच संदेश अंतराळवीर कल्पना चावलाने जगभरातील महिलांना दिला. अनादी काळापासून महिलांचे सामर्थ्य सर्वांना ज्ञात आहे. महिलांनी स्वःकत्वृत्वाने अनेक आव्हाने लीलया पार पाडले. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करींत आहेत. एक मुलगी दहा मुलांना भारी असते. दहा पुत्र जितके पुण्य देत नाहीत, त्यापेक्षा कित्येक पट जास्त पुण्य एक कन्या कुटुंबाला देते हे संस्कृती सांगते. आजची महिला पुरुषाच्या तुलनेत कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. देशाचे सर्वोच्च पद हे महिलेने भूषविले आहे. देशाची पंतप्रधान सुद्धा एक महिला होती. आज महिला भारतीय वायुदलात वैमानिक आहेत. लढाऊ विमान चालवून त्या गगनभरारी घेत आहे. सीमा सुरक्षा दल, भवानी दल आदी ठिकाणी महिलांनी आपल्या कार्यांची चुणूक दाखवून दिली आहे.

गणतंत्रदिनी दुचाकीवरील चित्तथरारक प्रात्यक्षिके करून देशाला रोमांचित केले. यावरून महिलांच्या कार्य कर्तृत्वाची प्रचिती तर येतेच त्याबरोबर त्यांच्या साहसाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. महिला स्वावलंबी झाल्या आहेत हे जरी खरे असले तरी आजही 63 टक्के महिलांना कारकुनी कामातच अडकून ठेवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारतातील स्त्री पुरुषांच्या वेतनातील असमानता 35 टक्के एवढी मोठी आहे. महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकत नाही, ही मानसकिता उद्योजकांबरोबरच पुरुष सहकार्‍यांमध्ये आजही पहायला मिळते. नोकरी करणार्‍या महिलांचे प्रमाण वाढले असले तरी कारकूनी अथवा सपोर्ट सिस्टिममध्येच त्या काम करीत आहेत. अधिकार पदापर्यंत पोहोचलेल्या महिलांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अवघे 33 टक्के आहे. असा निष्कर्ष युनायटेड नेशन्सच्या एका अहवालातून नुकताच पुढे आला आहे. जगभरात महिला वेगेवगळ्या क्षेत्रात प्रगती करीत आहे. मात्र आजही असमानतेच्या लढ्यात महिला पुरुषांपेक्षा कितीतरी मागेच आहे. जगभरात महिला आणि पुरुषांच्या उत्पन्नात आजही 24 टक्के तफावत आहे.

भारतात हे प्रमाण 35 टक्के आहे. महिलांना घरसंसार सांभाळून मुलांनाही सांभाळण्याची जबाबदारी असते. या जबाबदारीची सरकारी यंत्रणा अथवा महिला काम करीत असलेल्या कंपन्या गांभीर्याने घेत नाही. सरकारी यंत्रणा किंवा व्यवस्थापन महिलांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देत असले तरी यामध्ये जाणीव कमी आणि देखावाच जास्त असतो. त्यामुळे जगभरातील लाखो महिलांची प्रगती खुंटली आहे. सरकारने आईला मुलाचे संगोपन करताना नोकरीत अडथळे येणार नाही अशा योजना राबविल्या पाहिजेत. विनामोबदला आणि घरगुती कामांमध्ये महिला पुरुषांपेक्षा सात पटीने जास्त काम करतात. शासनामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. महिलांना शिक्षित, सक्षम आणि स्वयंपूर्ण बनविण्याचा या योजनांचा उद्देश आहे. महाराष्ट्र राज्याला देशातील एक अग्रेसर व पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज या महापुरुषांनी आपल्या राज्यातूनच सामाजिक क्रांतीची सुरुवात केली. महिलांच्या शिक्षणाची सुरुवात फुले दाम्पत्यांनी पुण्यातूनच केली. त्यावेळी जुन्या चालीरीती समाजात रूढ असल्यामुळे फुले दाम्पत्याला समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. तरीही घेतलेला वसा सोडून न देता समाजाचा रोष पत्करून त्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ अखंडपणे तेवत ठेवली. त्याचेच फलस्वरुप म्हणून आज सर्व क्षेत्रांत महिला आघाडीवर असल्याचे आपण पाहत आहे. महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचे तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांत स्त्रियांच्या सहभागाचे प्रमाण लक्षणीय आहे. स्त्रियांचे राजकीय क्षेत्रातील प्रमाण वाढावे यासाठी येथे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही त्यांना आरक्षण दिले आहे.

शिवाय शासकीय नोकर्‍यांमध्येही आरक्षण देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य ठरले आहे. याशिवाय राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने स्वतंत्र महिला आणि बालविकास विभाग स्थापन केला आहे. या विभागामार्फत अनेक योजना राबवीत आहे. ही खरोखर समाधान देणारी बाब आहे. इतर विभागांच्या योजनांमध्येही महिलांसाठी प्राधान्याचे स्थान दिले जात आहे. महिलांचा फक्त महिला दिनी नाहीतर प्रत्येक दिवस हा स्वातंत्र्याचा, सन्मानाचा असावा. समाजातील प्रत्येक महिलेने ‘मी सक्षम होते’ व यापुढेही सक्षम राहणारच असा आत्मविश्वास मनी बाळगला पाहिजे. महिला सक्षमीकरण होत आहे मात्र आर्थिकदृष्ट्या प्रत्येक महिला सक्षम होणे ही काळाची गरज आहे. महिलांप्रती समाजामध्ये सकारात्मक दृष्टिकोनाची व्याप्ती वाढणेही आवश्यक आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. परंतु कठुआ व उन्नाव येथे घडलेल्या घटना देशाला मान खाली घालणार्‍या आहेत याचा सर्व समाजाने विचार केला पाहिजे. मुलीना स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा शालेय शिक्षणात समावेश असावा.

त्यापलीकडे जाऊन पालकांकडून आपल्या पाल्यांवर सुसंस्कार होणे गरजेचे आहे. समाजानेही आपल योगदान दिले पाहिजे. महिलांना सुरक्षित ठेवायचे असे तर समाजानेच एक पाऊल पुढे उचलणे गरजेचे आहे. उन्हाळी वर्गाच्या माध्यमातून पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कला, कौशल्य व विविध प्रशिक्षण देणे क्रमप्राप्त तर आहेच पण त्याच बरोबर स्वयंशिस्तीचे व सक्षमतेचे धडे मिळणे तेवढेच गरजेचे आहे. महिला सक्षमिकरण करण्याची जबाबदारी कोणत्याही एका घटकाची नाही किंवा समाजातील कोणताही एक घटक ही जबाबदारी पूर्ण करू शकत नाही. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. गृहिणींनी संसारातून मिळणारा फुरसतीचा वेळ हा टीव्ही मोबाईल मध्ये वाया घालविण्यापेक्षा तो आपल्या मुलांशी मनमोकळेपणाने सुसंवाद साधण्यासाठी खर्च केल्यास पालकच आपल्या मुलांचे खरे मित्र होऊन यातून बर्‍याच अंशी समस्या दूर होऊ शकतात. यश कोणतेही असो श्रेय मात्र पुरुषालाच दिले जाते. परंतु प्रत्येक यशामध्ये स्त्रीशक्तीचा सिंहाचा वाटा असतो. एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. स्त्री जन्माला येते ती मुळातच कर्म करण्यासाठीच आणि या कर्माच्या तपश्चर्येतून प्रत्येक स्त्री तपस्विनी म्हणजेच योगिनी ठरलेली असते. त्यामुळेच या समाज मंदिराच्या उभारणीत प्रत्येक स्त्री ही कर्मयोगिनीच आहे असे मला वाटते.

LEAVE A REPLY

*