राहाता तालुका झाला हागणदारीमुक्त : सौ. विखे

0

हागणदारी मुक्ती सोहळा; स्वच्छतेचे बक्षीस मिळविण्यासाठी स्पर्धा करा!

अस्तगाव (वार्ताहर) – राहाता तालुका हागणदारीमुक्त झाला आहे, अशी घोषणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे यांनी केली. जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने राहाता तालुका हागणदारीमुक्ती उत्सवाचे आयोजन प्रवरानगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात आयोजित करण्यात आला होते, त्याप्रसंगी अध्यक्षा सौ. विखे बोलत होत्या.

जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, स्वच्छता व पाणी विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती उज्ज्वला बावके, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे, राहाता पंचायत समितीच्या सभापती सौ. हिराबाई कातोरे, उपसभापती बाबासाहेब उर्फ बबलु म्हस्के, प्रांताधिकारी नितीन ठाकरे, गटविकास अधिकारी जयंत उगले, नायब तहसीलदार राहुल कोताडे, गटशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्‍वर वाकचौरे आदींसह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तालुक्यातील 50 गावांचे सरपंच, ग्रामसेवक व सर्व सदस्य व मोठ्या संख्येने अंगणवाडी मदतनीस सेविका उपस्थित होत्या.

आपल्या भाषणात जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या, नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यानंतर राहाता तालुका हागणदारीमुक्त झाला आहे. श्रीरामपुर तसेच राहुरी तालुक्यांत 20 टक्के काम बाकी आहे. हे तालुकेही लवकरच हागणदारीमुक्त होतील. आपल्याला नगर जिल्हाच हागणदारी मुक्त करायचा आहे, असे स्पष्ट करत ना. सौ. विखे पुढे म्हणाल्या, राहाता तालुक्यात हागणदारी मुक्तीसाठी सर्वांनीच चांगले सहकार्य केले. स्वच्छतेच्या बाबतीत राहाता तालुका प्रथम क्रमांकावर राहील याची काळजी घ्या.

प्रत्येक गावाने निर्मलग्राम होण्यासाठी प्रयत्न करावेत, हागणदारी मुक्तीचे बक्षीस ग्रामपंचायतीने चढाओढीने मिळविले पाहिजे. स्पर्धा जरुर करा पण ती विकासासाठी करा. राजकारण न करता समाजकारणाची कास धरा तरच विकास होईल. पद्मश्री विखे पाटील, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी तालुक्याला विकासाची दिशा दिलेली आहे. ना. राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नाने विकास कामे होतील. अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबध्द आहोत.

ग्रामपंचायतींना मोठे अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे गावात सरपंच, सदस्य यांनी एकोप्याने गावाचा विकास करा, ग्रामसेवकांनी सरपंचांना, सदस्यांना विश्‍वासात घ्या व विकासाची कामे करा, ग्रामसेवक परस्पर पैसे काढतात अशा तक्रारी आलेल्या आहेत. शालेय पोषण आहार खराब असेल तर तो स्वीकारू नका, अधिकार्‍यांच्या लक्षात आणून द्या, असेही सौ. विखे पाटील म्हणाल्या.

जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे म्हणाले, राहाता तालुका हागणदारीमुक्त जाहिर झाला आहे. येथून पुढे तालुक्यातील प्रत्येक नागरिकाची स्वच्छता मेंटेन करण्याची जबाबदारी आहे. लोकसंख्या वाढली की, पुन्हा शौचालये बांधणे ही प्रक्रिया सुरू राहाणार आहे. याप्रसंगी उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती उज्ज्वला बावके, प्रांताधिकारी नितीन ठाकरे यांनी सुरक्षा दले स्थापन करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्या. प्रास्ताविक गटविकास अधिकारी जयंत उगले यांनी केले.

सूत्रसंचालन दिनेश भाने यांनी केले तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्‍वर वाकचौरे यांनी मानले. स्वच्छतेची प्रतिज्ञा कैलास चिंधे यांनी सर्वाना दिली. यावेळी पंचायत समिती सदस्य संतोष ब्राम्हणे, भारत आंत्रे, उमेश जपे, काळू रजपूत, सौ. अर्चना आहेर, सौ. शोभा जेजूरकर, सौ. तेलोरे, वाकडी जि.प.च्या कविता लहारे, सौ. पुष्पाताई रोहोम, दिनेश बर्डे आदींसह अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, मतदनीस, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

50 ग्रामपंचायतींचा सन्मान! – राहाता तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी तालुक्यातील 50 ग्रामपंचायतींनी मोठे सहकार्य केले. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. विखे यांनी या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक यांचा प्रातिनिधीक सत्कार केला. असे करताना त्यांनी आपल्या भाषणात या ग्रामपंचायतींनी विकासावर भर द्यावा, आपले गाव विकासात कसे आघाडीवर राहील हे सर्व ग्रामपंचातींना पाहावे, गावात एकोपा ठेवावा, राजकारण न करता समाजकारणाची कास धरावी तरच विकास होईल. असेही सौ. विखे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

*