शैक्षणिक गुणवत्तेसाठी लोकसहभाग आवश्यक : विखे

0

जिल्हा परिषद खंडाळा शाळेत ई लर्निंग योजनेचा शुभारंभ

अहमदनगर (प्रतिनिधी)– ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जावे, यासाठी जिल्हा परिषद सातत्याने विविध उपक्रम राबवित असते. या उपक्रमांना ग्रामस्थांचीही तितकीच तोलामोलाची साथ मिळायला हवी. जिल्ह्यातील अनेक शाळांचा लोकसहभागातून चांगला कायापालट झाला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य संधी व पाठबळ मिळाल्यास तेही विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करू शकतात. त्यामुळे दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षक, पालक यांच्यातील सहकार्य व संवाद आवश्यक आहे. शिक्षकांनीही स्वत:ची मुले समजून सर्व विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करायला हवा.
पालकांनीही मुलांचे वाढदिवस साजरे करताना शाळेला पुस्तकाची भेट द्यावी तसेच शाळेत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमेला हातभार लावावा, असे आवाहन जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी केले.
नगर तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेत बहुउद्देशीय संसाधन प्रशिक्षण केंद्र व ई लर्निंग सुविधेचे उद्घाटन अध्यक्षा विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास उच्च शिक्षण मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीपाद ढाकणे, अभाविपचे अध्यक्ष डॉ.प्रशांत साठे, जि.प.सदस्य संदेश कार्ले,
नगर मनपाच्या स्थायी समिती सभापती सुवर्णा जाधव, पं.स.सभापती रामदास भोर, शिक्षणाधिकारी सुनंदा ठुबे, ,गट शिक्षणाधिकारी रामदास हराळ, शिक्षक बँकेचे चेअरमन रावसाहेब रोहोकले, केंद्रप्रमुख विजयकुमार माने, सरपंच राजश्री लोटके, स्वाती कार्ले, गुलाबराव कार्ले, बाल हक्क अभियानचे राजेंद्र काळे, ज्ञानेश्‍वर लोटके, मुख्याध्यापिका मंदाकिनी लोटके आदी उपस्थित होते.
जि.प.सदस्य संदेश कार्ले म्हणाले की, खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळा इयत्ता 1 ली ते 7वीपर्यंत आहे. या शाळेने लोकसहभागातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर दिला आहे. बाल हक्क अभियानचे राजेंद्र काळे यांनी शाळेसाठी ई लनिंगचे साहित्य दिले आहे. मागील काळात नगर तालुक्यातील शाळांच्या विकासासाठी लोकसहभागातून तब्बल 75 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.
यातून अनेक शाळांचा कायापालट झाला आहे. शाळांसाठी ई लनिंग, संगणक साहित्य मिळत असले तरी वीजेची समस्या कायम आहे. वीज वितरण कंपनीकडून कमर्शियल दराने शाळांना वीज पुरवठा केला जातो. यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने सोलर सिस्टिमला प्रोत्साहन दिले पाहिजे.
यातून अखंडित वीज पुरवठा होवून वीज बिलाचा प्रश्‍नही मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शेळके यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक महेश वाकचौरे, प्रतिभा धामणे, किसन शेळके, प्रतिभा वाकचौरे, स्वाती नन्नवरे, शामला साठे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*