अहमदनगर(कर्मयोगिनी) | सौ.शालिनीताई राधाकृष्ण विखे : सामाजिक बांधिलकीच्या अग्रदूत

1

रा. लोणी बुद्रुक, ता. राहाता
पद- जिल्हा परिषद अध्यक्ष, अहमदनगर
संस्था- जनसेवा फाउंडेशन, प्रियदर्शनी महिला मंडळ.
कार्य- गरिब, दलित, आदिवासी महिला सबलीकरण. गट : राजकीय

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्यानंतर शिक्षण, आरोग्य, निर्मल ग्राम आणि विकासाच्या असंख्य योजना राबवून अहमदनगर जिल्हा परिषदेला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देताना नावलौकिकात मोठी भर घातली. महिलांना संधी मिळाल्यास त्या आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे सौ. शालिनीताई विखे पाटील या आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पुढे येऊ पाहणार्‍या महिलांसाठी त्या रोल मॉडेल ठरल्या आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्या जिल्ह्यात वहिनीसाहेब म्हणून ओळखल्या जातात.

माहेर आणि सासरची दोन्ही कुटुंब जरी राजकीय क्षेत्रात नावलौकिक प्राप्त असले तरी सौ. शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांना मात्र राजकारणापेक्षा समाजकारणाचीच आवड होती. विवाहानंतर विखे कुटुंबाच्या सदस्य झाल्यावर त्यांनी अनेक वर्षे कुटुंब, शेती याकडे लक्ष दिले.

सासू श्रीमती सिंधुताई यांच्यासोबत प्रियदर्शिनी महिला मंडळ, पतसंस्था आणि वाचनालय सुरू करताना त्यामार्फत महिला सबलीकरणाचे काम हाती घेतले. मुळातच महिलांविषयी असलेली तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून सबलिकरणाच्या कामाला गती दिली आणि परिवर्तन घडवले. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून 1632 बचत गट स्थापन करून तीस हजारांवर महिलांचे संघटन करून त्यांना प्रशिक्षण व स्वयंरोजगाराची संधी दिली.

प्रत्येकामध्ये कर्तृत्व हे उपजतच असते फक्त योग्यवेळी संधी मिळाली तर समाजाला त्याचा लाभ होतो. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कर्तृत्वाने कष्टकरी, श्रमजीवी समाजाला सुखाचे दिवस पाहायला मिळाले. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आणि ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे काळानुरूप बदल आत्मसात करून सर्वांगीन विकासाचे लाभधारक बनण्याची संधी ग्रामीण समाजाला मिळाली.

याच कुटुंबातील सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी हा वारसा सक्षमपणे पुढे चालवताना महिलांना संधी देऊन कुटुंब आणि राष्ट्र यांच्या विकासाला नवा आयाम दिला. वडील कै. नामदेवराव परजणे यांचे संस्कार आणि समाजाविषयीची तळमळ पाहून शालिनीताईंनी आपल्या जीवनात त्याची अंमलबजावणी केल्याचे त्यांच्या कार्यातून दिसते. परजणे आणि विखे घराण्याची सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली आहे.

महिला मंडळ, पतसंस्था यांच्या माध्यमातून असंघटित महिलांना प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. त्यातून शेकडो महिला शिवणकाम, शेवई मशीन, ब्युटी पार्लर, कांडप मशीन अशा व्यवसायात सक्रिय झाल्या. घरात त्यातून नवी पिढी पुढे जाण्यास मदत झाली. विशेष म्हणजे दलित, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व समाजातील महिलांना याचा लाभ झाला व आजही होतो आहे.

महिला स्वावलंबी झाली तर कुटुंब स्वावलंबी होते हे यातून समोर आले. बचत गटांच्या माध्यमातून जवळपास पावणे तीन कोटींची बचत तर झालीच पण त्यांना एक कोटींपेक्षा अधिक अनुदानही मिळवून दिले. त्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी विक्री केंद्र सुरू केले. साई स्वयंसहायता यात्रा भरवून कोट्यवधींची उलाढाल होऊ शकली. साईबाबा संस्थान व जनसेवा फाउंडेशनच्या समन्वयातून साई समधीवरील पुष्पहारांचा पुनर्वापर करून त्यातील निर्माल्याच्या आधारे ऑरगॅनिक अगरबत्ती बनवण्यात येत आहे.

यातून दोनशे महिलांना रोजगार तर मिळालाच पण भाविकांनी श्रद्धेने बाबांच्या समाधीवर वाहिलेली फुले कचर्‍याच्या ढिगार्‍यात न जाता योग्य वापर झाल्याने त्यांच्या श्रद्धेचे जतन केले जात आहे. हा प्रकल्प देशातील पहिला ठरला असून याच्या धर्तीवर देशभर अनेक ठिकाणी प्रकल्प सुरू केले जाऊ शकतात. महिला सक्षमीकरण करताना त्यांच्यातील अंधश्रद्धा दूर करणे, बेटी बचाव बेटी पढाव यासाठी जागृती व प्रबोधन करताना त्यांनी महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांकडेही विशेष लक्ष दिले आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा बनण्याचा त्यांना दोन वेळा मान मिळाला. यामागे त्यांचे केवळ काम आणि कठोर निर्णयांची अंमलबजावणी करण्याची पद्धत कारणीभूत ठरली आहे. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील सर्वाधिक गावे हागणदारी मुक्त व निर्मल ग्राम झाली. शिक्षण आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारला. प्रशासन गतिमान बनले. महिलांना मानसन्मान मिळू लागला. जिल्हा परिषद हा राजकारणाचा अड्डा नाही तर पंचायतराज व्यवस्थेतील विकासाचे प्रमुख केंद्र असल्याची जाणीव राज्यकर्त्यांना झाली. आजपर्यंत केलेल्या कामाची दखल अनेक संस्थांनी घेतली आणि त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

*