महिलांच्या गळ्यावर डाका!

0

सहा महिन्यांत  चेन स्नॅचिंग चा कहर

सागर शिंदे
अहमदनगर – जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरू असताना चेन स्नॅचिंगचा आलेख गगनाला भिडला आहे. चोर्‍या किंवा घरफोड्यांमुळे जिल्ह्यात सर्वत्र भयावह स्थिती निर्माण झाली आहे. महिलांना जीव मुठीत ठेवून घराबाहेर पडावे लागत आहे.
गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात एकूण 41 चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. यात 87 लाख 67 हजार 413 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. यातील अवघे तीन गुन्हे तडीस नेण्यात पोलिसांना यश आले आहे.
जिल्ह्यातील गुन्हेगारी टोकाला पोहोचली आहे. शेवगाव, एमआयडीसी, कर्जत, दूरगाव, नेवासा या ठिकणी हत्याकांड घडले आहेत. शेवगाव हत्याकांडातील आरोपींचे वास्तव्य नेवाशात असल्याचे समोर आले. हे आरोपी राज्यात पाच ते सहा खुनांच्या गुन्ह्यात पोलिसांच्या रडारवर  आहेत.
अन्य आरोपी दरोड्यातील 10 पेक्षा जास्त गुन्ह्यांतील असून नेवाशात राजरोस वावर होता.
अनैतिक संबंध, नाजूक कारणे, जमीन वाद, कौटुंबिक वाद यासाठी पोलिसांना कोणी दोषी धरू शकणार नाही.
मात्र, रोज घरफोडी, चेन स्नॅचिंग, बॅग पळविणे, महिलांच्या छेडछाड, रोडरोमियोंचा उच्छाद, जुगार, मटका, दारू अशा घटनांना तरी आळा घालणे पोलिसांच्या हातात असताना प्रत्यक्षात कोणतीही कृती होताना दिसत नाही.
वाढलेल्या गुन्हेगारीमुळे शहराच्या ठिकाणी महिला स्वत:ला सुरक्षित मानत नाहीत. नगर, श्रीरामपूर, संगमनेर, शिर्डी, नेवासा या ठिकाणी महिलांच्या छेडछाडीपासून तर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेण्याच्या घटना सर्वाधिक आहेत.
87 लाख गेलेल्या मुद्देमालात केवळ तोफखाना पोलिसांनी 57 हजार तर श्रीरामपुर पोलिसांनी 40 हजार 500 असा 97 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर अन्य पोलीस ठाण्यांमध्ये केवळ गुन्हे दाखल होऊन ते तपासावर आहेत.
चेन स्नॅचिंगची अकडेवारी ;
पोलीस ठाणे –  गुन्हे  – गेलेला ऐवज
कोतवाली       – 3 –    तीन लाख 42 हजार
तोफखाना       -9 –   चार लाख 46 हजार
एमआयडीसी   -1-   25 हजार
नेवासा          -1 –   61 लाख 34 हजार
कोपरगाव     – 2-    दोन लाख 60 हजार
शिर्डी            -4-    दोन लाख 27 हजार
राहाता         -2-     एक लाख 20 हजार
लोणी         -3-      एक लाख 78 हजार
संगमनेर     -8-     नऊ लाख 49 हजार
श्रीरामपूर    -5 –     एक लाख 64 हजार
राहुरी         -3-      एक लाख 23 हजार

87 लाख नव्हे तब्बल साडेतीन कोटी –
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी गेल्यानंतर पोलीस त्यांना विचारतात. हे सोने केव्हा घेतले होते. ज्या वेळी सोने घेतले, त्या वेळची किंमत लावण्याची रीत आहे. त्यामुळे गेलेला माल दीड लाखाचा असला तरी तो 80 ते 90 हजारांचा दाखविला जातो. त्यामुळे 87 लाख हा मुद्देमाल तब्बल साडेतीन कोटींचा असावा असे मत निवृत्त पोलीस अधिकार्‍याने व्यक्त केले.

हवे ते ठाणे देऊनही
काहीच फरक नाही –
पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी प्रत्येकाला हवे तेथे पोलीस ठाणे दिले. यामुळे गुन्हेगारी कमी व गुन्ह्यांची उकल होईल, असे सर्वांना वाटले होते. मात्र असे काही झाले नाही. गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढले. पोलीस गस्त कमी झाली. कर्मचार्‍यांना घराजवळ बदल्या दिल्याने काम कमी ‘घरवापसी’ जादा असे प्रकार सुरू झाले आहेत. शर्मा यांचे काम पारदर्शी असले तरी, प्रत्येक पोलीस ठाण्यात पूर्वीपेक्षा जोमाने ‘अर्थ’पूर्ण तडजोडी सुरू आहेत. त्यामुळे गुन्ह्यांचा निकाल कमी पण मलिदा गोळा करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
तोफखाना रडारवर –
तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंगच्या सर्वाधिक घटना घडत आहे. त्यामुळे या गुन्ह्यात तोफखाना जिल्ह्यात अव्वल स्थानावर आहे. मोठ्या विश्‍वासाने मानगावकर यांना पोलीस ठाण्याची सूत्रे हाती देण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून विशेष अशी कामगिरी झालेली दिसत नाही. उलट गांजा प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यांकडून तडजोड झाल्याचे बोलले जात आहे. रात्रीची गस्त, नाकाबंदी, अधिकार्‍यांचा जरब, आरोपी पकडणे, गुन्ह्यांची निर्गती असे एकही काम उल्लेखनीय नाही. त्यामुळे तोफखाना ठाणे अधिकार्‍यांच्या रडावर येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*