Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

रस्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे दागिने लांबविले 

Share
सिन्नर | वार्ताहर 
शेतात काम करत असलेल्या 55 वर्षीय महिलेला रस्त्याची माहिती विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी तीच्या कानातील चोवीस हजार रुपयांची कर्णफुले ओरबडून नेल्याचा प्रकार रविवारी दि.18 दुपारी बारा वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गालगत दोडी शिवारात घडला.
पुणे महामार्गालगत दोडी बुद्रुक येथील महारुख मळ्यात यमुना अर्जुन सांगळे (55) या शेतात खुरपणीचे काम करत असताना दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांच्याजवळ 20 ते 22 वयोगटातील एक अनोळखी तरुण आला. महामार्गापासून शेतात 50 फूट आतमध्ये   असणार्‍या सांगळे यांच्याकडे जात ‘हा रस्ता कुठे जातो? मला मुंबईला जायचे आहे. इथून साधन मिळेल का?’ असे विचारत त्याने त्यांना बोलण्यात गुंतवले.
त्याच दरम्यान अन्य एक युवक दुचाकी घेऊन शेताच्या बांधावर येऊन थांबला. तो आल्यावर सांगळे यांच्या जवळ बसलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली. मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी प्रतिकार केल्याने त्याने त्यांच्या दोन्ही कानातील कर्णफुले ओरबाडली. यात 18 हजार रुपये किमतीच्या कर्ण फुलांच्या दोन साखळ्या व सहा हजार रुपये किमतीचे एक कर्णफुल त्याच्या हाती लागले. सांगळे यांनी आरडाओरड केल्याने त्याने दुचाकीस्वार तरुणासोबत पळ काढला.
दरम्यान हा प्रकार घडत असताना सांगळे यांच्या घरातील अन्य सदस्य शेतात दुसऱ्या टोकाला दूर अंतरावर काम करत होते. आरडाओरड ऐकल्यावर त्यांनी धाव घेतली असता चोरीचा हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आल्यावर वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली.
नांदुरशिंगोटे व संगमनेर कडे जाणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. मात्र संशयास्पद तरुणांचा माग लागला नाही. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी सूचना दिल्या.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!