जिल्हा बँकेच्या निधीसाठी भुजबळांचे तुरुंगातून सरकारला साकडे

0

नाशिक,दि.२७ मे:- कर्जमाफीच्या आशेमुळे जिल्हा बँकेची वसुली ठप्प झाली असल्यामुळे याचा परिणाम पिक कर्जवाटपावर झाला आहे.नाशिक जिल्ह्यातील शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत सापडला असून त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण देखील वाढले आहे.

त्यामुळे त्यांना तात्काळ पिककर्ज पुरवठा करण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.

छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा करणारी आणि शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली आहे.

कर्जमाफीच्या आशेमुळे जिल्हा बँकेची वसुली ठप्प झाली आहे. यांचा परिणाम पिककर्जवाटपावर झाला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरु केली आहे. मात्र,जिल्हा बँकेच्या अडचणींमुळे पीककर्ज मिळण्याची शक्यता धूसर झालेली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दि. १ जानेवारी २०१७ ते २० मे २०१७ दरम्यान जिल्ह्यात ३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी पिककर्ज मिळणे गरजेचे आहे. तरी, शासनाने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिक कर्जासाठी जिल्हा बँकेला अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी शेवटी केली आहे.

LEAVE A REPLY

*