Type to search

Featured सार्वमत

सीईओ माने यांच्यावरील अविश्‍वासाची होणार चौकशी

Share

जिल्हा परिषदेच्या ठरावाला अनपेक्षित वळण

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांच्यावर आणण्यात आलेल्या अविश्‍वास ठरावाची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील तीन अधिकार्‍यांची समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती माने यांच्यावर सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आलेला ठपका आणि पारित झालेला अविश्‍वास ठराव यांची चौकशी करून ग्रामविकास विभागाला अहवाल 15 दिवसांत सादर करणार आहे.

विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने यांच्या सहीने याबाबतचे पत्र शनिवारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. यात ग्रामविकास विभागाच्या सुचनेनूसार मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांच्यावरील अविश्‍वास ठरावाची चौकशी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदलल्यानंतर अपंग सैनिकाची पत्नी असणार्‍या प्राथमिक शिक्षिकेची बदली, महिला बालकल्याण विभागाची पेसामधील रिक्त असणारी एक पद, पाणी गुणवत्ता समितीच्या बैठका न घेणे, टंचाईच्या काळात आलेल्या निधीतून साहित्य मिळण्या आधीच पुरवठादाराला अदा केलेले पेमेंट आणि अन्य कारणे पुढे करत 8 जुलैला झालेल्या सर्वसाधारण सभेत माने यांच्या विरोधात एकमुखी अविश्‍वास ठराव पारित करण्यात आला होता.

यापूर्वी जिल्हा परिषदेत पारित झालेल्या अविश्‍वास ठरावानंतर राज्य सरकारने संबंधीत अधिकार्‍यांना परत बोलविलेले आहे. पण माने यांच्याबाबत तसे झालेले नाही. ग्रामविकास विभागाने माने यांच्या अविश्‍वासाबाबत चौकशीचा निर्णय घेतला आहे. यासाठी नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील उप आयुक्त (आस्थपना), साहय्यक आयुक्त संचालक (विकास) आणि शाखा अभियंता विकास शाखा विभागीय आयुक्त कार्यालय या तिघांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती अविश्‍वाचा अहवाल तयार असून विभागीय आयुक्तांमार्फत तो ग्रामविकास विभागाला सादर करणार आहेत. त्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

तर अविश्‍वास विसर्जित
जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांच्या विरोधात सदस्यांनी एकमुखाने अविश्‍वास ठराव दाखल केला असला तरी राज्य सरकार हा ठराव विसर्जित करू शकते. तसे झाल्यास माने यांची बदली टळणार असून ते पुन्हा नगर जिल्हा परिषदेत काम करू शकतात. त्यामुळे एकाच पक्षातील दोन नेते, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, प्रशासन यांच्यातील काटकोन त्रिकोनातील हा सामना काय वळण घेणार, याबाबत उत्सुकता आहे.

अनेक ‘ताठ’माने!
माने प्रकरणात राजकारणातील अनेक ताठमानेंची चर्चा प्रशासन वर्तुळात आहे. जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री राम शिंदे विरोधात नव्याने भाजपात दाखल झालेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सुप्त राजकीय संघर्ष चर्चेत आहे. माने यांच्या विरोधात ठराव पालकमंत्री शिंदे यांना विखे गटाने दिलेला शह मानला जातो. माने यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ना. शिंदे जिल्हा परिषदेतील सत्तेवर अंकुश ठेवतात, अशी चर्चा होती. माने यांच्या अविश्‍वासाची चौकशी शासन पातळीवरून लागल्याने ना. शिंदे यांनी काही फिल्डिंग लावली का, असा प्रश्‍न उपस्थित होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेतील वर्चस्वाच्या खेळात माने प्रकरणाआड अनेक ‘ताठ’माने सक्रीय असल्याने प्रकरण अधिक रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!