अखेर नाशिक महापालिका हगणदारी मुक्त

0

नाशिक । दि.2 प्रतिनिधी
केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाकडुन स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभर वैयक्तीक व गट शौचालये बांधुन देण्याच्या कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल केंद्रीय समितीने पाहणी करीत आज हगणदारी मुक्त शहराची घोषणा केली आहे.

यात राज्यात नाशिक महानगरपालिकेचा समावेश असुन पुणे महापालिकेला पुन्हा प्रमाणित करण्यात आले आहे.

नाशिक शहर हगणदारी मुक्त झाल्याने आता केंद्र शासनाकडील काही प्रकल्प येऊ शकणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी आज दिली.

केंद्र शासनाने देशभरात हगणदारी मुक्त झालेल्या शहरांची यादी आज जाहीर केली आहे. यात राज्यातील नाशिक महापालिकेंसह क दर्जा असलेली वसई विरार महापालिका, मुळ, धरुर, दर्यापुर नगरपालिका यांचा समावेश आहे. नाशिक शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेला वैयक्तीक शौचालये बांधण्याचे दिलेले उद्दीष्ट पुर्ण करण्यात आले आहे.

तसेच गट शौचालये देखील करण्यात आले असुन काही ठिकाणी मोबाईल शौचालयांची व्यवस्था करण्यात आले आहे, या कामांनंतर नाशिक शहर हगणदारी मुक्त म्हणुन केंद्र शासनाने घोषीत केल्याचे आयुक्त यांनी सांगितले. शहरात झालेल्या सर्व कामांची पाहणीसाठी गेल्या 18 व 19 जुलै रोजी केंद्र शासनाच्या क्युसीआय पथकाने पाहणी केली. या पथकाने स्वत: काही ठिकाणी निवडुन त्यांची पाहणी केल्यानंतर नाशिक शहरातील कामासंदर्भात समाधान व्यक्त केल्यानंतर याचा अहवाल केंद्र शासनाला पाठविला होता.

त्यानुसार नाशिक शहराची निवड झाल्याचे आयुक्तांनी सांगितले. हगणदारी मुक्त म्हणुन घोषीत झालेली बी प्लस दर्जा असलेली नाशिक महापालिका ही एकमेव महापालिका असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. पुणे महापालिका ही यापुर्वी हगणदारी मुक्त म्हणुन केंद्रांने जाहीर केली असुन यावर्षी पुन्हा या शहराला हगणदारी मुक्त प्रमाणित करण्यात आले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविले जात असुन यात नाशिक महापालिकेला पर्यावरण व आरोग्य विषयक समस्या टाळण्यासाठी गरजु नागरिकांना वैयक्तीक व गट शौचालय बांधणीसाठी अनुदान देऊन उद्दीेष्ट देण्यात आले होते. या कार्यक्रमात आजपर्यत महापालिकेने 7 हजार 264 लाभार्थींनी वैयक्तीक शौाचालय बांधण्यासाठी प्रत्येकी 12 हजार रुपये (दोन टप्प्यात) अनुदान वाटप करण्यात आले आहे. तसेच 25 गट शौचालय बांधण्याचे काम करण्यात आले आहे. या शौचालय बांधण्यापोटी लाभार्थ्यांना आजपर्यत 8 कोटी 85 लाख 90,000 रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर महापालिकेच्यावतीने उघड्यावर शौचास बसु नये व शौचालयांचा वापर करावा म्हणुन बॅनर, फ्लेक्स व माहिती पत्रकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली होती. उघड्यावर शौचास बसणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी गुड मॉर्निंग पथके तयार करण्यात येऊन त्यांच्याकडुन कारवाई देखील करण्यात आली होती. या एकुणच कामांची दखल घेत केंद्र शासनाने नाशिक शहर हे हगणदारी मुक्त शहर म्हणुन घोषीत केले आहे.

LEAVE A REPLY

*