आज होणार मकरसंक्रांत साजरी

पतंगप्रेमींमध्ये उत्साह; बाजारपेठ सजली

0

नाशिक | प्रतिनिधी ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’ म्हणत नववर्षातील पहिला सण अर्थात मकरसंक्रांत सण साजरा करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असून, आबालवृद्धांनी त्यासाठी जंगी तयारी केल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. संक्रांतीनिमित्त सूर्यदेवतेचे पूजन, सुगडी पूजणे, इतर सुवासीनींना दान देणे, स्वयंपाकात खिचडी, भोगीची भाजी, भाकरी, गूळपोळी असा खास बेत करीत दुपारी कुटुंबासह पतंग उडविण्याचा आस्वाद घेणार आहे. संक्रांतीनिमित्त पंतंगासह पूजा साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे.

संक्रंात म्हटली की, पंतगप्रेतींमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते. याकरिता विधिरंगी पतंगांनी बाजारपेठ सजली असून आहे. आज पतंग खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये युवावर्गाची मोठी गर्दी दिसून आली. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती. सकाळपासूनच पतंगोत्सवाला शहरात सुरुवात होणार आहे.

पतंगोत्सवाचा पूर्ण आनंद घेता यावा व आपल्या कटलेल्या मांजामुळे इतरांच्या जिवावर बेतेल, असे प्रकार होऊ नयेत म्हणून काही पतंगप्रेमींनी मोकळ्या मैदानांवर, शहरापासून दूर अंतरावरील मोकळ्या माळरानात जाण्याचा बेत आखलेला आहे. विशेष म्हणजे इतर सणांची तारीख ही पंचांगानुसार बदलती असते मात्र संक्रांत ही दरवर्षी १४ जानेवारी या तारखेलाच येते. यावेळची मकरसंक्रांती विशेष आहे. कारण १७ वर्षानंतर रविवार आणि संक्रांतीचा योग जुळून आला आहे.

याआधी २००१ मध्ये हा योग आला होता. मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे अध्यात्मिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे शास्त्रीय महत्त्वही आहे. या दिवसा आधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. या नंतर रात्री लहान दिवस मोठा होत जातो. तसेच संक्रांतीनंतर ऋतूबदल होण्यास सुरुवात होते. हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते. संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी असे म्हणतात.

आज भोगी (१३ जानेवारी), संक्रांती (१४ जानेवारी) व किंक्रांती (१५ जानेवारी)अशा तीन दिवस हा सण साजरा केला जातो. आज भोगी असल्याने सर्व भाज्या एकत्र करुन भाजी केली जाते. तसेच बाजरी शरीर उष्ण ठेवण्यास आवश्यक असल्याने या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी खाण्याचीही पद्धत आहे.

काळ्या वस्त्रांचे महत्त्व
संक्रांतीच्या दिवशी काळ्या वस्त्रांना महत्त्व दिले जाते. कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. म्हणून काळ्या साड्या, काळी झबली, अशी वस्त्रे संक्रांतीच्या दिवशी परिधान केली जातात.

लहान मुलांचे ’बोर न्हाण’
संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी लहान मुलांचे ‘बोर न्हाण’ केले जाते. यावेळी लहान मुलांना भोवताली बसवून मध्ये पाटावर बाळाला बसवतात. त्याला काळं झबलं, अंगावर हलव्याचे दागिने, डोक्यावर मुकुट, मुरली या अन् अशा अनेक प्रकारच्या हलव्याच्या दागिन्यांची बाळाला सजवतात. त्याच्या डोक्यावरून कुरमुरे, बोरं, चॉकलेट, गोळ्या या सारख्या मुलांना आवडणार्‍या पदार्थांचा अभिषेक केला जातो.

LEAVE A REPLY

*