दाखले वितरणावर सीसीटीव्ही वॉच

जिल्हा प्रशासनाचा निर्णय; सहाय्यक जिल्हाधिकार्‍यांचे असेल नियंत्रण

0
नाशिक | दि. २६ प्रतिनिधी- सेतू कार्यालयातील अनागोंदी कारभार, कार्यालय परिसरात दलालांचा वाढता सुळसुळाट, सेतू कार्यालयात एजंटांचा होत असलेला हस्तक्षेप आणि महाऑनलाईनमुळे निर्माण झालेल्या तांत्रिक समस्यांबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गंभीर दखल घेत आता दाखले वितरण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या नियंत्रणात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सेतू कार्यालय, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालयांवर सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे, अशी माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.

इयत्ता १० वी, १२ वी परीक्षेचे निकाल येत्या काही दिवसांत जाहीर होतील. निकालानंतर प्रवेशासाठी लागणार्‍या विविध दाखल्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयात विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी होते हा दरवर्षीचा अनुभव आहे. या गर्दीचा फायदा घेत लवकर दाखला काढून देण्याचे आमिष दाखवून दलालांकडून पैसे उकळले जातात. या दलालांचा सेतू कार्यालयातील कामकाजात हस्तक्षेप वाढत असल्याचे जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आले आहे. यामुळे गैरप्रकारांना चालना मिळते.

त्यामुळे जे नागरिक प्रामाणिकपणे सेतूकडे अर्ज करतात त्यांना उशिराने दाखले मिळतात. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतो. आता अशा दलालांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. तसेच हे गैरप्रकार रोखण्यासाठी दाखले वितरण प्रक्रियाच सीसीटीव्हीच्या नियंत्रणात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सेतू, तहसीलसह प्रांताधिकारी कार्यालयात सीसीटीव्ही लावले जाणार आहेत.

या कॅमेर्‍यांचे नियंत्रण थेट सहाय्यक जिल्हाधिकार्‍यांकडे असेल. कार्यालयाबाहेर नियमानुसार ३३ रुपये शुल्क, प्रतिज्ञापत्राचे २० रुपये याप्रमाणे लागणार्‍या शुल्कांचे फलक लावले जाणार आहेत. त्यापेक्षा अधिक पैसे कुणी मागत असल्यास त्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. सेतू कार्यालयात दलालांचा सुळसुळाट रोखण्यासाठी यंदा प्रांताधिकारी कार्यालयाने देखरेखीसाठी यंत्रणा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

तीन दिवसात दाखला
दाखल्यासाठी अडवणूक होऊ नये म्हणून त्वरित दाखले मिळावे याला महत्त्व देऊन साधारण तीन दिवसात प्रत्येकाला दाखला मिळेल अशी यंत्रणा उभारली जाणार आहे. पालकांनी दाखल्यासाठी अर्ज केल्यानंतर त्याच दिवशी तो स्वाक्षरीसाठी प्रांताधिकारी कायार्लयात आला पाहिजे, असा दंडक केला जाणार आहे.

थेट तक्रार करा
ज्या दिवशी सेतू कार्यालयात विद्यार्थ्यांचे अर्ज येतील त्याच दिवशी प्रांत कार्यालयाकडे यावेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. दिवसाला तीन हजारापर्यंत दाखले निकाली निघतील अशा प्रकारची यंत्रणा कार्यरत केली जाईल. यात कुणी दलाली किंवा अडवणूक करीत असल्यास थेट संपर्क साधावा.
– अमोल येगडे (सहाय्यक जिल्हाधिकारी)

LEAVE A REPLY

*