Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

जात पडताळणीसाठी 5 लाखांची लाच मागितली : उपसंचालकासह चौघे अटकेत

Share

लाचेची रक्कम स्वीकारताना शिर्डीत दोघांना रंगेहाथ पकडले, मध्यस्थी नागापूरचा, 5 दिवसांची पोलीस कोठडी

शिर्डी (शहर प्रतिनिधी)– जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याकरिता ऑनलाईन केलेल्या अर्जाची सुनावणी झालेली असताना ते प्रमाणपत्र देण्यासाठी सुमारे पाच लाख रुपयांची लाच मागणार्‍या नाशिक येथील जातपडताळणी समितीचे उपसंचालक रामचंद्र सोनकवडे तसेच विधी अधिकारी शिवप्रसाद काकडे यांच्यासह खाजगी वाहन चालक महाजन आणि गायकवाड या मध्यस्थींवर शिर्डी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता 9 सप्टेंबरपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबतची फिर्याद दत्तात्रय गुलाबराव फलके (वय 43), रा. मानसिंग रेसिडन्सी, धनकवडी, पुणे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, नीता विठ्ठल धोंडगे (माहेरचे नाव नीता महादेव गायकवाड) यांचे हिंदू महादेव कोळी या जातीचे जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑनलाईन केलेल्या अर्जाची सुनावणी झाली असतानाही ते प्रमाणपत्र देण्यासाठी अनुसूचित जाती जमाती नाशिक विभागाचे उपसंचालक रामचंद्र रातीलाल सोनकवडे (वय 42), रा. काठे गल्ली, नाशिक तसेच विधी अधिकारी शिवप्रसाद मुकुंदराव काकडे (वय 41), रा. वसंत विहार, बडदेनगर शिवाजी चौक, सिडको यांच्यासह अहमदनगर येथील मच्छिंद्र मारुती गायकवाड (वय 48), रा,अहमदनगर नवनागापूर एमआयडीसी यांच्यामार्फत सुमारे 5 लाख रुपयांची लाचेची मागणी केली व दि. 4 सप्टेंबर रोजी सदर रकमेसह शिर्डी येथे भेटण्याबाबत कळविले. त्याप्रमाणे मी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांच्या कार्यालयात नोंदविलेल्या लाच मागणी तक्रारीची पडताळणी करण्यात आली.

पडताळणी मी पंच श्री. बढे यांच्यासह गायकवाड व खाजगी वाहन चालक सचिन उर्फ विनायक उत्तमराव महाजन (वय 33) धंदा खाजगी ड्रायव्हर, रा. वसंत विहार, शिवाजी चौक नाशिक यांच्यामार्फत उपसंचालक सोनकवडे व काकडे यांची शिर्डी येथील साई आसरा हॉटेलमधील रूम नंबर 102 मध्ये भेट घेतली. त्यावेळी सोनकवडे व काकडे यांनी जात पडताळणी प्रमाणपत्राचे काम होईल, असे सांगितले व त्यानंतर गायकवाड व महाजन यांनी ते प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणून सोनकवडे व काकडे यांना 5 लाख रुपयांची लाचेची मागणी केली. यावेळी गायकवाड यांनी मोबाईलवरून सोनकवडे यांच्याशी संपर्क करून माझ्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करून ते वाहन चालक महाजन यांच्याकडे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे अहमदनगर लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक श्री. खेडकर यांच्या मार्गदर्शनखाली त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक पवरे, पोलीस निरीक्षक करांडे, सोबतचे कर्मचारी तसेच पंच कृष्णराव सुभाष बढे, कर सहाय्यक, मनेश रामदास डोके कर सहाय्यक वस्तू व सेवाकर भवन अहमदनगर यांच्या सापळा रचून कारवाईदरम्यान खाजगी वाहन चालक महाजन यांनी गायकवाड यांचे व पंचासमक्ष दि. 5 सप्टेंबर रोजी मध्यरात्री शिर्डी येथील हॉटेल साईआसरा समोरील रोडवर उभे असलेल्या कारमध्ये उपसंचालक सोनकवडे, विधी अधिकारी काकडे यांच्यासाठी पाच लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता या पथकाने रंगेहाथ पकडले असून अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य केले म्हणून उपसंचालक सोनकवडे, विधी अधिकारी काकडे गायकवाड, महाजन यांच्याविरुद्ध फिर्यादी दत्तात्रय फलके यांच्या कायदेशीर फिर्यादिवरून शिर्डी पोलिसात गु.र.नं. 870/2019 सन 1988 चे कलम 7 व 7 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या चारही जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक खेडकर करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!