राहुरी फॅक्टरी येथे पुन्हा 9 लाखांची रोकड पकडली

0
file photo

श्रीरामपूरचे वाहन अन् रोकडही तीन गोण्या गुटखाही जप्त

राहुरी (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असताना आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाकडून नेमण्यात आलेल्या भरारी पथकाने काल रविवारी (दि.14) रोजी दुपारी 11.55 वा. राहुरी फॅक्टरी-देवळाली प्रवरा रस्त्यावरील वैष्णवी चौकात तपासणी करीत असताना एका पांढर्‍या रंगाच्या चारचाकी वाहनातून सुमारे 8 लाख 99 हजार 310 रुपयांची रोकड हस्तगत केली. यावेळी 40 हजार रुपये किंमतीच्या गुटख्याच्या तीन गोण्याही आढळून आल्या.

दरम्यान, ही रोकड सिलबंद करून नगर येथील जिल्हा कोषागार अधिकार्‍यांकडे जमा करण्यात आली असून गुटख्याच्या गोण्या अन्न व औषध प्रशासनच्या नगर येथील कार्यालयात पाठविण्यात आल्या आहेत. राहुरी तालुक्यातील या महिन्यातील ही सहावी कारवाई असल्याची माहिती संबंधित अधिकार्‍यांनी दिली. आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी नेमण्यात आलेल्या एसएसटी क्रमांक 5 चे प्रमुख ए.आर. पाटील यांनी तपासणी केली. त्यांनी अहवालात कारवाईबाबत नमूद केले आहे. या कारवाईमुळे आता बेकायदेशीररित्या रोकड वाहून नेणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

पुन्हा देवळाली नाक्यावर कारवाई…
वाहन तपासणी करताना पांढर्‍या रंगाची मारूती सुझुकी कार क्रमांक एमएच 17 एझेड 8924 या वाहनातून श्रीरामपूर (वार्ड नंबर 2) येथील सुभेदार वस्तीवरील वसीम नजीर मुलानी व श्रीरामपूर येथील दारूवाला चौकातील आजीम अब्दुल गफार जुजाणी हे ही रोकड व तीन गुटख्याच्या गोण्या घेऊन जात असताना आढळून आले आहेत. यापूर्वी रोकड पकडण्यात आली होती. ती श्रीरामपुरातील एका बँक शाखेची होती असे सांगण्यात आले. या कारवाया राहुरी फॅक्टरी ते श्रीरामपूर मार्गावरील देवळाली नाक्यावर करण्यात आलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

*