हार्दिक पंड्याच्या अडचणीत भर, भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0
नवी दिल्ली : भारतीय ऑलराउंडर हार्दिक पंड्याचे संघात पुनरागमन झाले असले, तरी देखील त्याच्या आणि त्याचा सहकारी क्रिकेटपटू लोकेश राहुल यांच्या मार्गातील अडचणी मात्र दूर झालेल्या नाहीत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ‘कॉफी वुईथ करण’ या टीव्ही शोदरम्यान महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध राजस्थानच्या जोधपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांव्यतिरिक्त चित्रपट निर्माता करण जोहर याच्या विरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

डिसेंबरमध्ये लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्या हे दोघे ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी करण जोहरशी गप्पा मारताना महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानांमुळे वादही निर्माण झाला आणि दोघांनाही भारतीय संघातून काही काळासाठी वगळण्यात आले होते.

या दोघांचे निलंबन मागे घेण्यात आले असतानाच आता त्यांच्या अडचणीत नवीन भर पडली आहे. हार्दिक, लोकेश आणि करण जोहर या तिघांविरोधात राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. हार्दिक पंड्यांने महापुरुषांचाही अपमान केल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. हार्दिक पंड्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील अपमान केला असून यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या, असे तक्रारीत म्हटले आहे.

 

 

LEAVE A REPLY

*