Type to search

Featured

नोकरी स्वीकारण्याआधी…

Share
नोकरी स्वीकारण्याआधी..., Career Before Job Acceptance

चांगल्या नोकरीसाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यामुळे एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू झाला आणि आपल्याला तेथे बोलावलं तर आपण चटकन होकार देऊन मोकळे होतो. पण, असं करण्याआधी काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्यायला हव्यात.

चांगली नोकरी मिळवणं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. तशी ती मिळाली तर कोणाला चांगलं वाटणार नाही? हे स्वप्न पूर्ण होण्यासाठीच नोकरी मिळवण्याची इच्छा असणारी व्यक्ती रोजच्या वर्तमानपत्रांमध्ये क्लासिफाईड सेक्शनचा एक एक शब्द अगदी बारकाईने वाचत असते. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी तो अनेक कंपन्यांमध्ये मुलाखतीसाठी अर्ज करतो. अर्ज केल्यानंतर इंटरव्ह्यूसाठी कॉल आल्यानंतर तो एकदम खुश होऊन जातो. तेथे गेल्यानंतर तो अगदी डोळे बंद करुन त्या नोकरीसाठी होकार देतो.

नोकरीसाठी होकार देताना इतर अनेक गोष्टींचा विचार करायला हवा. आपण त्याविषयी फार विचार करताना दिसत नाही. त्यामुळे नोकरीसाठी होकार देऊन ती सुरु केल्यानंतर काही दिवसांनी पश्‍चात्ताप करण्याची वेळ येते. असं होऊ नये यासाठी नोकरी मिळवण्याआधी काही महत्त्वाच्या मुद्यांकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं.

नोकरीत मिळणारं वेतन हा नोकरी मिळण्याआधीच चर्चिला जाणारा सर्वसामान्य विषय आहे. पण, त्याच्याशी संबंधित एक गोष्ट आहे. अनेकदा तरुण नोकरी चांगली असूनही पगाराच्या कारणावरुन ती सोडतात. नोकरी आणि त्याच्याबाबत असणार्‍या शक्यता आपल्याला चांगल्या वाटत असतील तर आपल्या पगाराबाबत एकदा चर्चा करुन बघा. आपलं म्हणणं कंपनीला पटून आपल्याला हवा तसा पगार मिळण्याची शक्यता त्यामध्ये असते. फक्त हे सांगताना आपल्या बोलण्याचा टोन कसा असावा, याकडेही लक्ष द्या. शक्यतो मार्दवपणे आपलं म्हणणं मांडावं.

ऑफिसमधील वातावरण कसं आहे, याकडेही लक्ष द्यायला हवं. आपण ज्या कंपनीत काम करता तेथील वातावरण आनंदी असलं तर काम करण्यासाठी आपल्याला अधिक मजा येऊ शकेल. नोकरी मिळवताना या गोष्टीकडे नक्की लक्ष द्यावं. ज्या कंपनीत नोकरी करणार आहोत तेथील वातावरणाशी आपण किती लवकर एकरुप होऊ शकतो, याचाही विचार करायला हवा. काम करायला लागल्यानंतर एखादी सहकारी व्यक्ती आपणच बॉस असल्याच्या थाटात तुमच्याशी वर्तन करत असेल तर त्या व्यक्तीचं ऑफिसमधील स्थान काय आहे, हे लक्षात घेऊन तिला किती महत्त्व द्यायचं हे ठरवायला हवं.

ऑफिसपासून आपलं घर किती अंतरावर लक्ष आहे, या गोष्टीकडेही अधिक लक्ष द्यायला हवं. इंटरव्ह्यूसाठी जाताना जे अंतर आपल्याला योग्य असल्याचं वाटलं होतं ते नंतर रोज जाण्यासाठी त्रासदायक होणार नाही ना हे तपासणं आवश्यक आहे. आपला बॉस आणि इतर सहकारी कसे आहेत, हे जाणून घेणं ही फार महत्त्वाची बाब आहे. ज्यांच्याबरोबर आपण काम करणार आहोत ते लोक फारसे चांगले नसतील तर त्यांच्याबरोबर काम करणं अवघड ठरते. त्यामुळे इंटरव्ह्यूसाठी गेल्यानंतर ऑफिसमधील लोकांची देहबोली, त्यांची एकमेकांशी बोलण्याची पद्धत कशा प्रकारची आहे हेदेखील जाणून घ्यायचा प्रयत्न करावा. त्यांचे एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत का, याकडेही लक्ष द्या. हे करणं थोडं अवघड आहे पण, आवश्यकही आहे. तेथे आपल्या परिचयातील एखादी व्यक्ती काम करत असेल तर तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा किंवा तेथे काम करणार्‍या व्यक्तीला ओळखत असेल अशा एखाद्या व्यक्तीशीही संपर्क साधता येईल.

नोकरी सोडण्याचा निर्णय आपण घेत असाल तर त्याबद्दल त्या ऑफिसमध्ये जरुर माहिती द्यावी. तसेच सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून मगच नोकरी सोडावी. याचं कारण भविष्यामध्ये काय दडलेलं आहे हे आपल्याला माहित नसल्याने असं करणं फार आवश्यक आहे. कदाचित त्या लोकांनाच आपल्याला पुन्हा सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे आपल्याच हातांनी आपली प्रतिमा बिघडवून घेण्यामध्ये कोणतंही शहाणपण नसतं.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!