Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कॅन्टोन्मेंटच्या कर्मचार्‍यांची पोलिसांना धक्काबुक्की

Share

टोलनाक्यावर अतिरिक्त पैसे वसूल केले जात असल्याचे आले समोर

अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रत्येक ट्रकची अडवणूक करून 60 रुपयांची पावती द्यायची व 260 रुपये उकळायचे. कॅन्टोन्मेंटच्या टोल नाकावर हा प्रकार सुरू होता. तेथे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे आपल्या पथकासह गेले असता त्यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी चौकशी केली असता त्यांच्या पथकातील कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मोरे यांनी फिर्याद दिली आहे. अर्जुन सबाजी ठुबे (वय- 42 रा. दरेवाडी ता. नगर) याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे पथकासह नगर-सोलापूर रोडने वाळुंज बायपासकडे जात होते. त्यावेळी कॅन्टोन्मेंटच्या टोल नाक्यावरील कर्मचारी माल ट्रकच्या (क्र. टीएन- 52 क्यु- 2127) चालकाला शिवीगाळ करत होते. पोलीस निरीक्षक मोरे यांना हा प्रकार लक्षात आला. नाक्यावरील कर्मचारी प्रत्येक वाहन चालकाची अडवणूक करून 260 रुपये घेतात व 60 रुपयांची पावती देतात. मालट्रक चालकानेही हा प्रकार पोलीस निरीक्षक मोरे यांच्या लक्षात आणून दिला. या संदर्भात मोरे चौकशी करत असताना दुचाकीवर (क्र. एमएच- 16 सीएन- 1799) अर्जुन ठुबे तेथे आला. त्याने चौकशी करणार्‍या पोलिसांना अडथळा निर्माण करत धक्काबुक्की केली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांच्या फिर्यादीवरून अर्जुन ठुबे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.

कॅऩ्टोमेंटच्या टोलनाक्यावर सर्रास असा प्रकार सुरू होता. वाहनचालकांना दमदाटी करून जास्तीचे पैसे घेतले जात होते. कोणी विचारणा केल्यास मारहाणीपर्यंत प्रकरण जात होते. वारंवार होणार्‍या या प्रकाराकडे कॅन्टोमेंटचे पूर्णतः दुर्लक्ष होत असे. पोलीस देखील याची दखल घेत नव्हते. मात्र आता पोलिसांनाच तेथील गुंड़गिरीचा अनुभव आल्यामुळे आता तरी तेथील प्रकाराला आळा बसेल का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. टोलनाक्यावरील दादागिरीचे एक एक किस्से सांगितले जातात. जशी जशी रात्र वाढत जाईल, तशी तेथील गुंडगिरी जास्त वाढत जाते. रात्रीच्यावेळी जाणार्‍या वाहनांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात असल्याचीही अनेक वर्षांपासूनची चर्चा आहे.

कॅन्टोमेंटच्या टोलनाक्यावर त्यांचे कर्मचारी ट्रक चालकाकडून 260 रुपये घेत होते. त्याला धमकी देऊन अजून पैसे मागत होते. हा प्रकार पाहून मी त्याठिकाणी गेलो. सात ते आठजण पळून गेले. अर्जुन ठुबे नावाचा व्यक्ती तेथे आला. मी मॅनेजर आहे, तुम्ही आम्हाला विचारणारे कोण, असे म्हणत आमच्या कर्मचार्‍यांना धक्काबुक्की केली. ट्रक चालकाकडून 60 रुपये टोल घेतला जातो. येथे बळजबरीने जास्त पैसे वसूल केले जात आहेत. या टोलनाक्यावर वसुलीचे दरपत्रक नाही. वसुली करणार्‍या कर्मचार्‍यांकडे ओळखपत्र नाही.
-अविनाश मोरे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!