शेवगाव पालिकेची सर्वसाधारण बैठक रद्द

0

ठरावाप्रमाणे अगोदर कामे करा ः नगरसेवकांची मागणी

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – विकासात्मक कामावर चर्चा करण्यासाठी काल बोलावण्यात आलेल्या सर्वसाधारण बैठकीवर मागील सर्वसाधारण सभेतील ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याने नाराजी व्यक्त करत संतप्त झालेल्या नगरसेवकांनी सभा रद्द करण्यास भाग पाडले, यामुळे सर्वसाधारण बैठक पुढील आठवड्यात घेण्याचे जाहीर करण्यात आले.
नगरपालिका स्थापन होऊन सुमारे दोन वर्षाचा कालावधी उलटला आहे. तर जानेवारी 2016 मध्ये निवडणूक होऊन दीड वर्षे झाली आहेत. परंतु पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने पालिकेच्या खात्यात कोट्यवधी रुपयांचा निधी जमा होऊनही तो विकास कामांवर खर्च करता आलेला नाही. यामुळे शेवगावचा विकास थांबला आहे.
चौदावा वित्त आयोग, तसेच आमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नातून नगरोत्थान, वैशिष्ट्यपूर्ण व रस्ते अनुदान या माध्यमातून 11 कोटी रुपयांचा निधी गेल्या दीड वर्षात पालिकेला मिळाला आहे. या कालावधीत पालिकेच्या आठ सर्वसाधारण सभा झाल्या, प्रत्येक सभेत नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात सुचविलेली तसेच इतर कामे याबाबत चर्चा व ठराव होतात.
मात्र त्यावर अंमलबजावणी होत नसल्याचे सांगत नगरसेवक अरुण मुंडे, महेश फलके, सागर फडके यांनी अगोदर मागील ठरावावर कार्यवाही करा तरच आजची सभा घ्या, अशी भूमिका घेतली. त्यांना इतर नगरसेवकांनीही साथ दिली. नगरसेवकांच्या या भूमिकेमुळे पालिका प्रशासनाला सभा तहकूब करावी लागली. ही सभा येत्या 2 ऑगस्टला घेण्याचे प्रभारी मुख्याधिकारी वसुधा कुरणावळ यांनी सांगितले.

पालिका स्थापन झाल्यानंतर शेवगाव शहराचा विकास होईल अशी नागरिकांची रास्त अपेक्षा होती परंतु गेल्या दीड वर्षातील कारभार पाहता ग्रामपंचायतच बरी होती असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. मागील सर्वसाधारण सभेत पालिकेच्या जागांवर फलक लावणे, गटारींची स्वच्छता, दिवाबत्ती, चौदाव्या वित्त आयोगातील व इतर योजनांतील कामे यासह अनेक विषयांवर ठराव झाले होते. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही.

LEAVE A REPLY

*