स्पर्धा परिक्षांमधील समांतर आरक्षण रद्द करा; एमपीएससी परिक्षार्थींंच्या शिष्टमंडळाचे पंकजा मुंडेंना साकडे

0
नाशिक । राज्यसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणार्‍या स्पर्धा परिक्षांसाठी शासनाने समांतर आरक्षण सुरू केल्याने प्रामुख्याने महिला व खेळाडू परिक्षार्थी उमेदवारांवर अन्याय होत असल्याने या परिक्षांसाठीचे समांतर आरक्षण रद्द करण्यात यावे असी मागणी राज्यस्तरीय समांतर आरक्षण विरोधी चळवळ समितीच्या शिष्ट मंडळाने ग्रामविकास, महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे.

या शिष्ट मंडळाने मुंडे यांची भेट घेत त्यांच्याशी दिर्घ चर्चा करून त्यांना निवेदन सादर केले. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, राज्यसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने ज्या परिक्षा घेतात यामध्ये जातीनिहाय देण्यात आलेल्या आरक्षणानुसार उमेदवारांच्या जागा आरक्षीत ठेवल्या जातात.

खुला गट हा सर्वांसाठी खुला आहे. यामुळे यापुर्वी सर्वसाधारण प्रवर्गासह इतर जाती जमातींचे उमेदवार खुल्या गटातून अर्ज भरू शकत होते. तसेच गुणवत्ता यादीनुसार त्यांना त्या जागी नोकरीच्या संधी दिल्या जात होत्या. परंतु याबाबत शासनाने 13 ऑगस्ट 2014 रोजी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार समांतर आरक्षण लागू केल्याने खुल्या गटातील महिलांच्या जागांसाठी केवळ सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवार अर्ज करू शकतात. इतर उमेदवारांना खुल्या गटातून अर्ज भरण्यास मनाई करण्यात आली आहे.

याचा फटका प्रामुख्याने महिला व खेळाडू उमेदवारांना बसत आहे. खुल्या गटातून अर्ज भरण्यास मनाई करण्यात अल्याने सर्व उमेदवारांना त्या त्या आरक्षीत गटातून अर्ज करावे लागत आहेत. यामुळे इतर जाती, जमातीच्या उमेदवारांची संख्या मोठी व जागा कमी असल्याने अंतर्गत स्पर्धेला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागते. परिणामी त्या त्या आरक्षीत गटांची गुणवत्ता यादी ही खुल्या गटापेक्षा उच्च लागते.

तर खुल्या गटात गुणवत्ता यादी कमी लागूनही इतर प्रवर्गातील उमेदवारांना अधिक गुण असूनही संधी मिळत नाही. यामुळे अनेक गुणवंत महिला व खेळाडूंकडे गुणवत्ता असूनही अन्याय होत आहे. यामुळे समांतर आरक्षण रद्द करून हा अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी या शिष्ट मंडळाने केली आहे.

या शिष्ट मंडळात मनिषा सानप, रोशनी तांबडे, सोनाली पवार, सुवर्णा पगार, अमोल घुले, सतीश बढे, सुनील कोकरे, तेजस्वीनी गुंडाळे, अनिल गिते यांच्यासह पुणे, नाशिक, मुंबई, वासीम, परभणी, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बारामती येथील राज्यसेवा आयोगाचे परिक्षार्थी उमेदवारांचा सामवेश होता.

LEAVE A REPLY

*