केंब्रिजचा नवीन वाद विद्यार्थ्यांचे दाखले घरपोहोच

0
इंदिरानगर | दि. ८, प्रतिनिधी – येथील केंब्रिज स्कूलमधील फी वाढीच्या प्रकरणावरून वाद उत्पन्न झालेले असतानाच शालेय व्यवस्थापनाने तब्बल दीडशे विद्यार्थ्यांचे दाखले पालकांच्या पत्त्यावर घरपोहोच परत पाठवून नवीन वाद उत्पन्न केला आहे.

केंब्रिज स्कूल व्यवस्थापनाच्या कारभाराविषयी पालकवर्गाच्या अनेक तक्रारी असून त्यात अवास्तव शुल्क वाढ, शालेय साहित्य खरेदीची सक्ती करणे अशा तक्रारींचा समावेश असून या संदर्भात पालकांनी शालेय शिक्षण मंडळाकडेही तक्रार दाखल केलेली आहे. त्यातच २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाचे शुल्क न भरल्याचे कारण दाखवून व्यवस्थापनाने दीडशे विद्यार्थ्यांचे दाखले त्यांच्या घरपोहोच पाठविले आहेत. याबाबत पालकांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वाढीव शुल्क निश्‍चिती करण्याबाबतचे प्रकरण विभागीय शुल्क नियामक समितीपुढे असून त्यावर सुनावणी सुरू असतानाच शाळेने आणखी एक नवीन वाद ओढवून घेतला आहे. फी वाढीसंदर्भात व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेलाही स्थगिती देण्यात आली असून मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी यांनीही शाळेला शुल्क वाढीबाबतची सुनाणी कार्यवाहीत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तरीही व्यवस्थापनाकडून दररोज नवनवीन वाद उत्पन्न केले जात असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून फी भरलेली नसतानाही शाळेने त्यांना वर्षभर बसू दिले आहे. फी भरण्याबाबत पालकांना अनेकवेळा पत्र व स्मरणपत्रे देण्यात आली आहेत. तर किमान १५ वेळा फोनवरून सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही पालकांनी फी भरली नसल्याने त्यांना दाखले देण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण शाळेच्यावतीने प्राचार्य नादेर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*