उर्ध्व गोदावरील प्रकल्पाच्या सुधारित ९१७ कोटींच्या किंमतीस मंत्रिमंडळाची मान्यता

0

मुंबई: ता. १ : उर्ध्व गोदावरी प्रकल्प, जि.नाशिक या प्रकल्पास रु.917.74 कोटी इतक्या किंमतीस तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देणे बाबत आज मंत्रीमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय झाला असल्याचे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांनी सांगितले आहे. सदरचा निर्णय हा नाशिक जिल्ह्याच्या सिंचन व पिण्याच्या पाण्यासंदर्भात अतिशय महत्वाचा निर्णय असल्याचे मत श्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केले आहे.

उर्ध्व गोदावरी प्रकल्प, जि.नाशिक हा प्रकल्प गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सर्वसाधारण व आदिवासी क्षेत्रातील मोठा पाटबंधारे प्रकल्प असून गोदावरी नदीच्या उपनद्यांवर आहे. या प्रकल्पाच्या पाणी वापरानुसार नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण 74,210 हेक्टर सिंचन क्षेत्रास लाभ होणार आहे. सदर प्रकल्पात वाघाड, करंजवण, पालखेड , ओझरखेड, तिसगाव, पुणेगाव अशा 6 प्रकल्पांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पुणेगाव, ओझरखेड, करंजवण व वाघाड प्रकल्पांच्या स्थिरीकरणासाठी मांजरपाडा वळण योजना व इतर 10 वळण योजनांचा समावेश आहे. सदर प्रकल्पास सन 1964-65 चे दरसूचीवर आधारित रु.14.29 कोटी किमती साठी मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. यानंतर सन 1996-97 चे दरसूचीवर आधारित रु. 189.98 कोटी किमतीसाठी प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तद्नंतर सन 2005-06 चे दरसूचीवर आधारित रु. 439.12 कोटी किमतीसाठी व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

उर्ध्व गोदावरी प्रकल्पाचे काम सन 1966 पासून सुरु आहे. या प्रकल्पातील धरणे व कालवे बहुतांशी पूर्ण झाली असल्याने सुधारित प्रशासकिय मान्यता प्राप्त झाल्यास या प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करुन प्रकल्प सर्वार्थाने पूर्ण होणार आहे असेही श्री गिरीष महाजन यांनी सांगितले. या प्रकल्पांतर्गत एकूण 74,210 हेक्टरपैकी 71,551 हेक्टर सिंचनक्षेत्राची निर्मिती झालेली आहे.

प्रस्तावीत तृतीय सुधारित प्रशासकिय मान्यता प्राप्त झाल्यावर वाढीव खर्च करणे शक्य होईल व उर्वरित 2,659 हेक्टर सिंचनक्षेत्राची निर्मिती करणे शक्य होईल.

मा. उच्च न्यायालय,मुंबई, खंडपीठ औरंगाबाद, येथील जनहीत याचिका क्र 173/2013 मधील न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व वळण योजना विहीत कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेल्या योजनांमधून 292.70 दल घ.फू. पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येत आहे. सर्व योजना पूर्ण झाल्यास अतिरीक्त 951 दल घ.फू. पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्याने नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त दिंडोरी, चांदवड, येवला, निफाड, कोपरगाव व वैजापूर तालूक्यांना सिंचनाचा फायदा होणार आहे. तसेच वळण योजनांच्या पाणी साठ्यांमधून स्थानिक आदिवासींना सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा लाभ होणार आहे.

मा.मंत्रीमंडळाने बांधकामाची सद्य:स्थिती, किंमत वाढीची कारण मिमांसा, राज्य-तांत्रिक सल्लागार समितीचा अहवाल तसेच प्रकल्पातील कामाच्या अनुषंगाने सिंचन विषयक विशेष चौकशी समितीच्या अहवालात नमुद केलेली निरीक्षणे व त्या अनुषंगाने केलेली कार्यवाही यांचा सखोल परामर्श घेऊन नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद या जिल्ह्यांना वरदान ठरणाऱ्या उर्ध्वगोदावरी प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्याच्या उद्देशाने प्रकल्पाच्या सन 2009-10 च्या दरसूचीवर आधारित रुपये 917.74 कोटी इतक्या किंमतीच्या तृतीय सुधारित प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता देण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला असल्याचे जलसंपदा मंत्री, श्री गिरीष महाजन यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

*